For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघांच्याही गतीचा निरोध करतात

06:32 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघांच्याही गतीचा निरोध करतात
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंत म्हणाले, योगी ज्ञानेन्द्राrयांना त्यांच्या ताब्यात ठेवतात. त्यामुळे त्यांना हवे ते इंद्रीयांकडून करून घेतात. त्यासाठी ते विषयांची म्हणजे त्यांच्या इच्छांची आहुती इंद्रियरुपी अग्नीत देत असतात. माणसाच्या इच्छाच नाहीशा झाल्या तर ज्ञानेन्द्राrयांना काही कामच उरत नाही. काही योगी संयमाच्या अग्नीत इंद्रिये आणि प्राण अर्पण करून टाकतात. आत्मज्ञानाच्या अग्नीने योग्याच्या दोषांचे क्षालन होते. प्रथम ऋद्धिसिद्धीच्या मोहाचा धूर नाहीसा होतो. निर्विचार मनाचे इंधन त्या ज्ञानरूपी ठिणगीला घालतात. त्यामुळे ज्ञानाच्या ज्वाला प्रदीप्त होतात. त्या ज्वालेमध्ये नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जळतात. असा यज्ञ करणारा पुरुष अहं ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रियकर्मांच्या आहुती देतो. यज्ञांनी साधक माया मोहाचे पारीपत्य करतात. त्यामुळे त्यांना ईश्वर स्वरूपाचे कायम स्मरण राहते.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, अशी निरनिराळी नावे असलेल्या यज्ञांनी संयमी यज्ञ करतात.

Advertisement

द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी । संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ।। 28 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, संयमी करत असलेल्या यज्ञांना अनेक नावे आहेत. त्यापैकी काहींना ‘द्रव्ययज्ञ’ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात. कित्येक ‘योगयज्ञ’ म्हणून सांगितले आहेत. कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, म्हणजेच मौन व्रत धरण करतात. मौन व्रत म्हणजे नुसते बोलणे बंद करणे नव्हे तर मनात त्यासबंधी विचारसुद्धा न आणणे होय. म्हणून मौन धारण करण्यापूर्वी मन निर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. मनातल्या इच्छा नष्ट झाल्या की, त्याबद्दलचे विचार मनात येत नाहीत. मनात विचार येण्याचे बंद झाले की त्यासंबंधी चिंतन आपोआपच बंद पडते. त्यामुळे त्यावर बोलणे होत नाही. त्याला ‘वागयज्ञ’ असे म्हणतात. ज्यात ज्ञानाने ब्रह्म जाणता येते, तो ‘ज्ञानयज्ञ’ होय. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठिण आहेत. कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. ज्यांनी इंद्रिये जिंकली आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन तसे आचरण घडते. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योगसमृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात म्हणजे आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात.

पुढील श्लोकात भगवंत पूरक, रेचक ह्या प्राणायामाच्या माध्यमातून योगी करत असलेल्या यज्ञाची माहिती देतात.

होमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते । रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ।। 29 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कित्येक योगी अभ्यासाने अपानवायुरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात, म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात. काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात. याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघाच्याही गतीचा निरोध करतात. त्याला कुंभक म्हणतात. दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे करू शकणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.