इन्फोसिसचा तिमाही नफा 21 टक्क्यांनी वाढला
वाढीसह नफा 8,501 कोटींच्या घरात : 25 रुपयांचा लाभांश
वृत्तसंस्था, मुंबई
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 21 टक्क्यांनी वाढून 8,501 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत नफा 7,033 कोटी रुपयांचा होता.
यातून मिळणारा महसूल सुमारे 13.38 टक्क्यांनी वाढला आहे. तो 46,402 कोटींवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी 40,925 कोटी होता. महसूल म्हणजे वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम. चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2027 साठी आपला महसूल मार्गदर्शक अंदाज 1.5 टक्के-3.5 टक्केपर्यंत सुधारित केला आहे.
25 रुपयांचा लाभांश देणार
याशिवाय, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 25 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. कंपन्या आपल्या नफ्याचा काही भाग भागधारकांना देतात, याला लाभांश म्हणतात.
रेव्हेन्यू गायडन्स म्हणजे काय?
आयटी कंपन्या प्रत्येक तिमाहीत अंदाज लावतात की संपूर्ण वर्षासाठी त्यांचा महसूल किती वाढू शकतो. याला ‘गायडन्स“ म्हणतात. इन्फोसिसने ते 3.5 टक्के पर्यंत वाढवले आहे, याचा अर्थ असा की कंपनीला येत्या काही महिन्यांत नवीन ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
समभाग वर्षात 16 टक्क्यांनी घसरला
निकाल जाहीर होण्यापूर्वी इन्फोसिसचे शेअर्स जवळपास 3 टक्के घसरून 1,231.80 वर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला आहे. तर, गेल्या 6 महिन्यांत तो 20 टक्के आणि या वर्षी 1 जानेवारीपासून 25 टक्केने घसरला आहे. एका वर्षात 16 टक्केची घसरण झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 5.15 लाख कोटी रुपये आहे.