शेअर बायबॅकमध्ये इन्फोसिसचे प्रवर्तक भाग घेणार नाहीत
नारायण मूर्ती, सुधा यांचा नसेल सहभाग : लाभांश वाढवणार
वृत्तसंस्था/मुंबई
इन्फोसिसने 18000 कोटी रुपयांच्या शेअरबायबॅक योजनेची यापूर्वीच घोषणा केलेली होती किंबहुना यात आता कंपनीचे प्रवर्तक व प्रवर्तक समूह भाग घेणार नाहीत असे कळते आहे. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये नंदन निलेकणी व सुधा मूर्ती यांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी सेबीकडे सदरची माहिती देण्यात आली आहे. प्रवर्तकांकडे बायबॅकच्या घोषणेवेळी एकूण 13.05 टक्के इतकी हिस्सेदारी होती. यामध्ये कंपनीचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती, त्यांची कन्या अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती यांचा समावेश आहे. याशिवाय सहसंस्थापक नंदन निलेकणी, त्यांची पत्नी रोहिणी निलेकणी व त्यांची मुले निहार, जान्हवी निलेकणी हेदेखील प्रवर्तक समुहातील सहकारी आहेत. इतर सहसंस्थापक आणि त्यांचे कटुंबातील सदस्यही कंपनीत हिस्सेदारी राखून आहेत.
बायबॅकसंबंधी...
इन्फोसिसने 11 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 18000 कोटी रुपयांच्या शेअरबायबॅक योजनेला मंजुरी दिली होती. याअंतर्गत कंपनी 10 कोटी समभाग खरेदी करणार असून ज्याची फेस व्हॅल्यू 5 रुपये प्रति समभाग असणार आहे. ही एकूण इक्विटी भांडवलापैकी 2.41 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. बायबॅकअंतर्गत समभागाची किंमत 1800 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आली आहे.
समभागाची कामगिरी
इन्फोसिसच्या समभागाची कामगिरी पाहता वर्षभरात समभाग 20 टक्के इतका घसरणीत राहिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 6.10 लाख कोटी रुपयांवर राहिले होते. देशातील दुसऱ्या नंबरची मोठी आयटी सेवा देणाऱ्या कंपनीचा समभाग याचदरम्यान गुरुवारी सकाळच्या सत्रात 3 टक्के वाढलेला होता. 3.76 टक्के वाढत समभाग बीएसईवर 1527 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात समभाग 1472 रुपयांवर बंद झाला होता. 1981 मध्ये बेंगळूरात नारायण मूर्ती यांनी 6 सहकाऱ्यांसह इन्फोसिसची सुरुवात केली होती.
लाभांशात होणार वाढ
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2025 पासून पुढील 5 वर्षात आपल्या फ्री कॅश फ्लोमधील जवळपास 85 टक्के हिस्सेदारी लाभांश किंवा शेअर बायबॅकअंतर्गत समभागधारकांना परत करेल. दरवर्षी लाभांशात वाढ केली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 2017 पासून ते 2020 पर्यंत कंपनीने 3 बायबॅकच्या योजना सादर केल्या होत्या. 2017 ला 13000 कोटी, 2019 मध्ये 8260 कोटी आणि 2022 मध्ये 9300 कोटी रुपयांची बायबॅक योजना सादर केली होती.