इन्फोसिसने कमावला दुसऱ्या तिमाहीत 7823 कोटीचा नफा
निव्वळ 6 टक्के वाढ : महसूल 49 हजार कोटीवर
वृत्तसंस्था, बेंगळूर
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने जुलै ते सप्टेंबर अवधीतील दुसऱ्या तिमाहीत 7823 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता नफ्यात कंपनीने 6 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या महसुलात दुसरीकडे 11 टक्के वाढ झाली असून दुसऱ्या तिमाहीत 49,244 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने मिळवला आहे.
इन्फोसिसने याचदरम्यान 26 रुपये प्रति समभाग असा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 3 नोव्हेंबर 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीत मागच्या वर्षी कंपनीचा परिचालन महसुल 44490 कोटी रुपये इतका होता.
काय म्हणाले सीईओ
इन्फोसिसचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले की, कंपनीला 5.2 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. यात 2 अब्ज डॉलर्सचे मेगा कंत्राटही आहे. करार वाढल्याचा फायदा कंपनीला नक्कीच झाला आहे. एआययुक्त सेवांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात कंपनीने 10 टक्के इतकी वाढ नेंदवली आहे. याचदरम्यान कंपनी येत्या काळातही एआय आधारीत सेवांवर गुंतवणूक सुरुच ठेवणार असल्याचे प्रतिपादन पारेख यांनी केले आहे.
समभागावर परिणाम
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचा नफा अपेक्षेनुसार दिसून न आल्याने याचा परिणाम समभागावर सोमवारी नकारात्मक पहायला मिळाला. हा समभाग सुमारे 4 टक्के घसरला होता. समभाग सोमवारी 1119 या भावावर खुला झाला. याआधीच्या म्हणजेच शुक्रवारच्या सत्रात समभाग 1154 रुपयांवर बंद झाला होता. नंतर हा समभाग 1109 भावापर्यंत इंट्रा डे दरम्यान घसरला होता. गेल्या काही वर्षापासून हा समभाग दबावात आहे. बीएसई डाटानुसार पाहता समभाग 33 टक्क्यापर्यंत घसरला आहे.
