इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांचा राजीनामा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) निलांजन रॉय यांनी राजीनामा दिला आहे. ते 31 मार्च 2024 रोजी आपल्या पदावरुन बाजूला होणार आहेत. 1 एप्रिल 2024 पासून जयेश संघराजका हे सीएफओ पद सांभाळतील, असे कंपनीने म्हटले आहे.
निलांजन रॉय हे 2018 पासून कंपनीचे सीएफओ होते. यापूर्वी माजी अध्यक्ष रवी कुमार एस आणि मोहित जोशी यांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. इन्फोसिसने गेल्या 12 महिन्यांत किमान आठ वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचारी गमावले आहेत. काही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये सामील झाले आहेत.
जयेश 18 वर्षांहून अधिक काळ इन्फोसिसमध्ये नियमितपणे काम करत आहेत. त्यांचा कामाचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या कामाचा विचार करुनच त्यांना हे पद सोपवण्यात आले आहे. जयेशने कंपनीत अनेक नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. जयेश यांनी कंपनीत अनेक नेतृत्व पदे भूषविली आहेत. ते सध्या कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि उपमुख्य वित्तीय अधिकारी (ऑक्टोबर 2015 पासून) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 25 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे आणि ते चार्टर्ड अकाउंटंटही आहेत.
जयेशच्या नियुक्तीबद्दल इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी काय म्हणाले?
जयेशच्या नियुक्तीबद्दल, इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले, ‘मला हे घोषित करताना आनंद होत आहे की जयेश संघराजका सीएफओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांचा अनुभव कंपनीच्या विकासात नक्कीच कामी येईल, अशी आशा आहे.
नीलांजन यांच्या जाण्याने नेतृत्वाची पोकळी
अमेरिकेतील आयटी रिसर्च फर्म एचएफएस रिसर्चने म्हटले आहे की, निलांजन आणि इतरांच्या जाण्याने इन्फोसिसमध्ये निर्माण झालेली नेतृत्व पोकळी चिंताजनक आहे. आगामी काळात कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी आणि एमडी सलील पारेख यांना कंपनीचे जहाज स्थिर करण्यासाठी आवश्यक ती जोरदार पावले उचलावी लागतील.