राकसकोप जलाशयात पाण्याची आवक सुरूच
जलाशय भरण्यास 8.5 फूट पाण्याची गरज : पाणी पातळीत वाढ...!
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बुधवार दि. 22 रोजी एका दिवसात जलाशयाच्या पाणीपातळीत 1.1 फुटाने वाढ झाली आहे. सध्या जलाशयात 2467 फूट पाणीसाठा असून जलाशय भरण्यास केवळ 8.5 फूट पाण्याची गरज आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच राहिल्यास लवकरच जलशय तुडुंब भरण्यास मदत होणार आहे.
बेळगाव शहराला हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने दोन्ही जलाशयांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली. इतकेच नव्हे तर राकसकोप जलाशयातील पाणीसाठा रिकामा झाल्याने मृत साठ्यातून पाणी उपसा केला जात होता. त्यासाठी 35 एचपीच्या दोन विद्युत मोटारी जोडण्यात आल्या होत्या. मृत साठ्यातून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्यावर लक्ष्मीटेक येथील प्रकल्पात शुद्धीकरण करून ते पाणी पुरविले जात होते. जलाशयामध्ये आवश्यक पाणीसाठा नसल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवले होते. त्यामुळे बेळगावकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याचे योग्य नियोजन करून केवळ पिण्यासाठीच पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते. त्यातच 12 ते 13 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. आवश्यकतेनुसार टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. संपूर्ण जून महिन्यात पाऊस न झाल्याने मोठी चिंता सर्वांना लागून राहिली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली. तब्बल आठ दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी होण्यासह नदी, नाले, तुडुंब भरून वाहू लागले. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने हळूहळू पाणी पातळीत वाढ होत चालली आहे.
सध्या जलाशयात 2467 फूट पाणीसाठा
सध्या बुधवार दि. 22 जुलै सकाळपर्यंत राकसकोप जलाशयात 2467 फूट पाणीसाठा आहे. जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता 2475.50 फूट इतकी आहे. त्यामुळे जलाशय भरण्यास केवळ 8.5 फूट पाण्याची आवश्यकता आहे.