देशी पर्यटकांचा ओघ गोव्याकडे
उन्हाळी सुट्टीचा घेतात आनंद : राज्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल
पणजी : राज्यामध्ये उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे गोव्यातील जवळपास सर्व हॉटेल्स सध्या तुडुंब भरलेली आहेत. सध्या मे महिना चालू आहे आणि उकाडा देखील बराच वाढलेला आहे. असे असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली आहे. अनेक किनारी भागामध्ये सकाळी आणि सायंकाळी पर्यटकांची गर्दी दिसून येते. तसेच गोव्यातील अनेक पर्यटनस्थळांवर, पर्यटक मोठ्या प्रमाणात जमलेले दिसतात.
सध्या देशात सर्वत्र उन्हाळी सुट्टी चालू आहे. त्याचा लाभ घेऊन अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन गोव्यात पोहोचले आहेत. येथील उन्हाळी पर्यटनाचा ते आनंद घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसात गोव्यात पडलेल्या पावसामुळे वातावरणात थोडाफार गारवा आला. तसेच वातावरण दमट असल्यामुळे उन्हाचा थेट फटका बसत नाही. त्यामुळे पर्यटक सर्वत्र मनमुरादपणे फिरत आहेत. यंदाच्या या उन्हाळी मोसमात गोव्यातील जवळपास सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांना हे दिवस चांगले निघाले आहेत. अनेक टॅक्सी चालकांना देखील मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाल्याने ते देखील समाधानी आहेत.