महागाईचा ‘जोर का चटका’
कमर्शियल गॅस सिलिंडर दरात तब्बल 993 रुपयांची लक्षणीय वाढ : तूर्तास ‘घरगुती’चे दर जैसे थे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांनी वाढ करत व्यावसायिकांना मोठा ‘चटका’ दिला. 5 किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरातही 261 रुपयांची वाढ झाली आहे. तथापि, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या दरवाढीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार नसला तरी हॉटेलमधील चहा, नाश्ता आणि जेवणाच्या थाळीच्या दरात वाढ झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फटका बसणार आहे.
दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत आता 3,071.50 रुपये झाली आहे. यापूर्वी, हा सिलिंडर अंदाजे 2,078.50 रुपयांना मिळत होता. 1 मे 2026 पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 993 रुपयांनी वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातील ही तिसरी दरवाढ आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी 115 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी अंदाजे 200 ची आणखी वाढ झाली. त्यानंतर आता सलग तिसऱ्या महिन्यात म्हणजेच 1 मे पासून 993 रुपये दरवाढ जाहीर झाली आहे.
5 किलो वजनाचा सिलिंडरही महागला
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीव्यतिरिक्त देशात 5 किलो वजनाच्या एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलिंडरची किंमत आता 549 वरून 810 रुपये झाली आहे. तात्काळ प्रभावाने प्रतिसिलिंडर 261 रुपयाने दरवाढ झाली आहे. यांना मिनी सिलिंडर किंवा छोटे सिलिंडर म्हणूनही ओळखले जाते. हे सिलिंडर प्रामुख्याने पीजी किंवा वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी किंवा एकटे काम करणारे कामगार वापरतात. या सिलिंडरचा वापर प्रामुख्याने लहान आस्थापनांकडून आणि मर्यादित व्यावसायिक कामांसाठी केला जातो. यावर कोणतेही अनुदान नसते. याची किंमत बाजारभावाच्या जवळ असल्याने जागतिक चढ-उतारांचा त्यावर त्वरित परिणाम होतो.
घरगुती सिलिंडर ग्राहकांना दिलासा
तथापि, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्याच्या दरानुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 913 आहे. कोलकातामध्ये याची किंमत 939 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय इंधन दरात वाढ होऊनही देशाच्या सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय दरातील चढ-उतारांपासून सर्वसामान्य ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक दबावामुळे सरकारने सध्या तरी स्वयंपाकाच्या गॅसला महागाईच्या थेट परिणामापासून वाचवले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीही स्थिर
घरगुती एलपीजीसोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीही स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. एकूण वापरापैकी सुमारे 90 टक्के वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती अपरिवर्तित राहिल्याचे आयओसीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे, सुमारे 33 कोटी ग्राहकांसाठी घरगुती एलपीजीच्या (14.2-किलोग्रॅम सिलिंडर) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वितरित होणाऱ्या केरोसीनच्या किमतीतही कोणतीही वाढ झालेली नाही.
तेल कंपन्यांचे स्पष्टीकरण
कमर्शियल सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी सुमारे 80 टक्के पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. त्यामुळे बहुतेक ग्राहकांसाठी स्थिरता सुनिश्चित झाली आहे. किमतींमधील सुधारणा निवडक औद्योगिक क्षेत्रांपुरत्या मर्यादित आहेत. त्यांचा वापरामध्ये तुलनेने लहान वाटा आहे आणि जागतिक मानकांच्या आधारावर नियमित मासिक समायोजनाच्या अधीन आहेत, असे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.
दरवाढीचा सर्वात आधी कोणाच्या खिशाला फटका?
व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील वाढीचा सर्वात मोठा फटका लहान व्यवसायांना (फेरीवाले, विक्रेते आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स) बसतो. लहान खानावळी, रस्त्यावरील विक्रेते आणि स्थानिक रेस्टॉरंट्स हा खर्च त्यांच्या नफ्यात जास्त काळ सामावून घेऊ शकत नाहीत. या दरवाढीमुळेच अनेक ठिकाणी चहा आणि अन्य खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. साहजिकच कमर्शियल सिलिंडर महाग झाल्यास दुकानदारासोबतच ग्राहकांनाही त्याचा फटका बसतो. व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढेल. परिणामी, ते चहा, नाश्ता आणि जेवणाच्या थाळीच्या दरात वाढ करू शकतात. लग्नसमारंभातील केटरिंगदेखील महाग होऊ शकते.