देशवासियांना पुन्हा महागाईचा तडाखा
घरगुती स्वयंपाकाच्या गॅसदरात 3.50 रुपयांची वाढ; व्यावसायिक सिलिंडर 8 रुपयांनी महाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील महागाई थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी एलपीजी गॅसच्या दरात महिन्याभरात दुसऱयांदा वाढ झाली. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच देशात एलपीजी सिलिंडरची किंमत 1,005 रुपयांच्या वर पोहोचली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनता हैराण झाली असतानाच आता गॅस सिलिंडरचा चटकाही वाढत चालला आहे.
नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. तसेच एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1,029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,018.50 रुपयांवर पोहोचली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात (7 मे) घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी मार्च 2022 मध्येही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तसेच आता चालू महिन्यात दुसऱयांदा साडेतीन रुपयांनी दर वाढवण्यात आला आहे. नव्या दरवाढीनंतर बिहारमधील सुपौल येथे घरगुती गॅस सिलिंडर सर्वाधिक 1,107 रुपय्नांवर पोहोचला आहे. बिहारप्रमाणेच मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 14.2 किलोचा सिलिंडर 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत गेला आहे.
अलीकडेच 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 102 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर कमर्शियल सिलिंडरची किंमत 2,355 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी कमर्शियल सिलिंडरची किंमत 1 एप्रिल रोजी 250 रुपयांनी वाढविण्यात आली होती. आता पुन्हा 19 मे रोजी कमर्शियल सिलिंडर 8 रुपयांनी महागला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावण्यास सुरुवात केली आहे. देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यांपासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.