दिवाळीला महागाईच्या झळा
फराळांच्या किमतीत वाढ : सर्वसामान्य हैराण, गतवर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या साहित्यामध्ये मोठी वाढ
बेळगाव : दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने फराळ आणि इतर पदार्थांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदा वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. फराळासाठी लागणारे तेल, डाळी, मैदा, आटा, साखर, शेंगा, बेसन, डालडा आदींच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. दिवाळी जसजसी जवळ येत आहे. तसतसा फराळच्या तयारीला वेग येऊ लागला आहे. मात्र फराळासाठी लागणाऱ्या उपपदार्थांचे दर अधिक वाढल्याने गृहिणीची चिंता वाढली आहे. बाजारात प्रति किलो गूळ 50 रु., साखर 44 रु., फुटाणे डाळ 110 रु., तूरडाळ 180 रु., मूगडाळ 120 रु., हरभरा डाळ 100 रु., तर तुरडाळीने 150 रुपयेच्या पुढे मजल मारली आहे. मैदा 40 रु., आटा 40 रु., रवा 40 रु. असा दर आहे. सर्व डाळींनी शंभरी गाठली आहे. तर 35 रु. किलो मिळणारा रवा, आटा, मैदा देखील 40 रुपये झाला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
खाद्यतेल भडकले
ऐन सणासुदीतच खाद्यतेलाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. 15 किलोचा डबा 300 ते 400 रुपयांनी वाढला आहे. हेल्थफिट, जेमिनी, सूर्यफूल आदी खाद्य तेलांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतील फोडणीला महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे. त्याबरोबर बाजारात दिवाळीच्या फराळासाठी लागणारी पिठीसाखर प्रति किलो 50 रु., डालडा 120 रु., बेसन 110 रु., शेंगदाणे 130 रु. असा दर झाला आहे. 90 रुपये किलो मिळणारा डालडा 120 रु. झाला आहे. त्यामुळे दिवाळीतील रेडिमेड फराळही यंदाच्या महागणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या साहित्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांना जादा पैसे मोजावे लागणरा आहेत. तर वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना खरेदीवर आवर घालावी लागणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच किराणा साहित्यामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दिवाळी जवळ येत असल्याने फराळासह इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात लगबग वाढू लागली आहे. खाद्याच्या वस्तूबरोबर इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल व आकाश कंदीलही दाखल झाले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यांच्याही किमती वाढलेल्या पाहावयास मिळत आहेत. एकूणच यंदाची दिवाळी सर्वसामान्यांना महागाईचा चटका लावणारी आहे.