For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालकांच्या आरोग्यासाठी शिशु आहाराचे नियम कडक; पॅकेजवर आईच्या दुधाचा संदेश बंधनकारक

06:14 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बालकांच्या आरोग्यासाठी शिशु आहाराचे नियम कडक  पॅकेजवर आईच्या दुधाचा संदेश बंधनकारक
Advertisement

मुंबई : शिशु आहार उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आईचे दूध हे शिशूसाठी सर्वोत्तम असल्याची सूचना ठळकपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. बालकांच्या पोषणाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोर करण्यावर विभागाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दोन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी पॅकेजमधून विक्री होणाऱ्या शिशु फॉर्म्युला, शिशु दूधअन्न आणि इतर संबंधित उत्पादनांवर आवश्यक सूचना देणे बंधनकारक असेल. सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईचे दूध देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, फॉर्म्युला मिल्कवर बंदी नसून त्याच्या वापराबाबतचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

नव्या नियमांनुसार शिशु आहाराच्या पॅकेजच्या पुढील भागावर ‘आईचे दूध हे शिशूसाठी सर्वोत्तम दूध आहे’ अशी सूचना द्यावी लागेल. तसेच उत्पादनाचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा, हे उत्पादन शिशूसाठी एकमेव पर्याय नसल्याचे नमूद करावे आणि हे पूरक अन्न असून सहा महिन्यांनंतर वापरावे, अशी माहिती पॅकेजवर देणे आवश्यक असेल. पॅकेजवर आई व मुलाचा फोटो वापरण्यासही मनाई करण्यात येणार आहे.

Advertisement

या नियमांची अंमलबजावणी पुरवठादार, ब्रँड मालक तसेच ई-कॉमर्स विक्रेत्यांनाही लागू राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. राज्यभरातील तपासणीत अनेक शिशु उत्पादनांवर आवश्यक सूचना आढळल्या नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांखालील बालकांना आईचे दूध देण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

राज्यातील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिशु आहाराच्या जाहिराती, पॅकेजिंग आणि वापराबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देणे हा या नियमांमागील उद्देश असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.