गर्भातच अर्भकाचा मृत्यू : बाळंतिणीचाही बळी
कोप्पळ जिल्हा इस्पितळातील हृदयद्रावक घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात बाळंतिणींच्या मृत्युचे दुष्टचक्र सुरुच असून योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने गर्भातच बाळाचा मृत्यू झाला, तर उपचाराचा उपयोग न झाल्याने बाळंतिणीचाही बळी गेला. कोप्पळ जिल्हा इस्पितळात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
मुळच्या बेळगाव जिल्ह्याच्या कुकनूरच्या आडूर येथील गर्भवती रेणुका प्रकाश हिरेमनी प्रसूतीसाठी सोमवारी रात्री कुष्टगी तालुका इस्पितळात दाखल झाल्या. मात्र तेथे उपचाराची योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना कोप्पळ जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आले होते. मध्यरात्री 2:30 च्या प्रसूतीसाठी सज्जता करण्यात येत होती. यावेळी गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी सिझेरियन करून अर्भकाला बाहेर काढले. यावेळी प्रकृती खालावल्याने रेणुकावर उपचार करण्यात येत होते. मात्र, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या धक्क्यामुळे रेणुकाचा मृत्यू झाला.