इंधनाच्या निर्बंधामुळे उद्योगक्षेत्राला फटका
उपाययोजना करण्याची ट्रेड फोरमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहरातील व्यापारी, व्यावसायिक आस्थापने आणि औद्योगिक संस्थांना पेट्रोलपंपांवर पॅन व बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. सध्याच्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याची जाणीव असूनही या पूर्ण निर्बंधामुळे जनरेटरवर अवलंबून असलेल्या उद्योग-व्यवसायांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी व्यासायिक, व्यापारी, आद्योगिक संस्था व हॉस्पिटल्सना कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल द्यावे, अशी मागणी ट्रेडर्स फोरमतर्फे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. निवेदनात, शहरातील अनेक भागांत सध्या वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनियमित पाऊस आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे दुकाने, वस्त्रव्यवसाय, उद्योग, कार्यालये, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, कोल्ड स्टोरेज, औषध दुकाने, बँकिंग सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा चालवण्यासाठी जनरेटरचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून खुले पेट्रोल व डिझेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पॅनमध्ये पेट्रोल उपलब्ध होत नसल्याने अनेक आस्थापनांना वीज खंडित झाल्यावर जनरेटर चालवणे शक्मय होत नाही.
परिणामी व्यापार व उद्योगांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच ग्राहक सेवा आणि व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होत असून तापमान संवेदनशील वस्तूंचे नुकसानही झेलावे लागत आहे. ऊग्णालये व वैद्यकीय सेवांमध्ये व्यत्यय येत असून हॉटेल, रेस्टॉरंट आणि सेवा क्षेत्रांना अडचणी निर्माण होत आहेत. लघु व मध्यम उद्योगांच्या उत्पादनात घट झाली असून डिजिटल बिलिंग, बँकिंग आणि पेमेंट प्रणाली विस्कळीत झाली आहे. बेळगाव हे महत्त्वाचे व्यापारी आणि औद्योगिक केंद्र असल्याने येथे अखंडित सेवा सुरू राहणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज आहे. जनरेटरसाठी मर्यादित प्रमाणात पॅनद्वारे पेट्रोल व डिझेल पुरवठ्याची परवानगी द्यावी. वैध ओळखपत्र, व्यवसाय नोंदणी किंवा जीएसटी क्रमांकाच्या आधारे पेट्रोल देण्याची व्यवस्था करावी. पेट्रोलपंप चालकांना स्पष्ट व व्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. वीज खंडित परिस्थितीत व्यापार, उद्योग व अत्यावश्यक सेवांना दिलासा द्यावा. व्यापारी, उद्योजक व औद्योगिक हिताच्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी सतीश तेंडोलकर, मुकेश खोडा, राजू पालीवाला, नितेश जैन यांच्यासह ट्रेड फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.