For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योग‘रतन’ हरपले

07:10 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्योग‘रतन’ हरपले
Advertisement

भारताच्या उद्योगविश्वाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्याचे प्रेरणास्रोत आणि मानवी मूल्यांचे शक्तीस्थान असणारे रतन नवल टाटा यांचे निधन झाले आहे. अथक परिश्रमक्षमता, अतुलनीय व्यावसायिक प्रतिभा आणि अजोड बुद्धीमत्ता असा अद्भूत त्रिवेणी संगम त्यांच्या ठायी होता. आपल्या 21 वर्षांच्या नेतृत्वकाळात त्यांनी याच गुणांच्या माध्यमातून टाटा उद्योगसमूहाला जगातील एक महान उद्योगसमूहाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने भारताच्या उद्योगविश्वाला जगाचे डोळे दिपतील अशी झळाळी मिळवून दिली. अशा विजिगिषु  व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या महान कार्याचा हा संक्षिप्त परिचय... डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सूनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. त्यांचा परिवार पारशी धर्माशी संबंधित आहे. रतन टाटा यांचे आईवडिल विभक्त झाल्याने आजीने त्यांचा सांभाळ केला होता. 1991 मध्ये रतन टाटा यांना टाटा समुहाचे अध्यक्ष करण्यात आले होते.

Advertisement

21 वर्षे समुह अध्यक्ष, नफा 50 पट

1962 मध्ये रतन टाटा यांनी परिवाराच्या उद्योगसमुहात काम करण्यास सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी टाटा स्टीलच्या शॉप फ्लोरवर काम केले. यानंतर ते व्यवस्थापनाच्या स्तरावर भरारी घेत राहिले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांनी पद सोडल्यावर समुहाची धुरा रतन टाटा यांच्याकडे आली. 2012 मध्ये 75 वर्षे वय झाल्यावर रतन टाटा यांनी कार्यकारी जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या 21 वर्षांच्या अध्यक्ष पदादरम्यान टाटा समुहाचा नफा 50 पट वाढला. यातील बहुतांश उत्पन्न जग्वार-लँडरोव्हर व्हेईकल्स आणि टेटली यासारख्या लोकप्रिय टाटा उत्पादनांच्या विदेशातील विक्रीतून प्राप्त झाले होते. अध्यक्षपद सोडल्यावर रतन टाटा यांनी 44 वर्षीय सायरस मिस्त्राr यांना उत्तराधिकारी नियुक्त केले. सायरस मिस्त्राr यांचा परिवार टाटा समुहात सर्वात मोठा वैयक्तिक हिस्सेधारक होता. परंतु पुढील काही वर्षांमध्ये मिस्त्राr आणि रतन टाटा यांच्यात मतभेद निर्माण झाले. ऑक्टोबर 2016 मध्ये मिस्त्राr यांना टाटा समुहाच्या संचालक मंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. तर फेब्रुवारी 2017 मध्ये नव्या उत्तराधिकारीचे नाव घोषित होईपर्यंत रतन टाटांनी अध्यक्ष म्हणून पुन्हा कार्य पाहण्यास सुरुवात केली होती.

Advertisement

पुस्तकप्रेमी अन् कारचे चाहते

रतन टाटा यांना बालपणापासून कमी संभाषण आवडायचे. ते केवळ औपचारिक आणि आवश्यक संभाषण करायचे. पुस्तकप्रेमी असलेल्या रतन टाटा यांना सक्सेस स्टोरीज वाचणे अत्यंत पसंत होते. निवृत्तीनंतर मी या छंदाला वेळ देत असल्याचे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. रतन टाटा यांना 60-70 च्या दशकातील गाणी ऐकणे आवडायचे. शास्त्राrय संगीत वाजवू शकलो तर मला अत्यंत आनंद होईल असे ते म्हणायचे. रतन टाटा यांना विविध कार्सची मोठी आवड होती. जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या कार्सचा त्यांना छंद होता. विशेषकरून कार मॉडेलचे स्टायलिंग आणि मॅकेनिज्मबद्दल त्यांना विशेष रुची होती.

महामारीदरम्यान सढळहस्ते मदत

रतन टाटा हे सामाजिक कार्यात सामील टाटा ट्रस्टमध्ये सक्रीय होते. टाटा समुहाचा हा ट्रस्ट शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. टाटा सन्सच्या लाभांशाचा 60-65 टक्के हिस्सा समाजकार्यासाठी वापरला जावा, असा निर्णय रतन टाटा यांनी घेतला होता. तसेच रतन टाटा यांनी कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी 500 कोटी रुपयांची भरीव देणगी दिली होती. रतन टाटा यांनी एक एक्जीक्यूटिव्ह सेंटर स्थापन करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलला 50 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. रतन टाटा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते.

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार...

स्वत:च्या साधेपणाद्वारे लोकांची मने जिंकणारे रतन टाटा हे नेहमीच युवांसाठी रोल मॉडेल राहिले आहेत. स्वत:च्या प्रेरणादायी वक्तव्यांनी त्यांनी युवांना नेहमीच प्रेरित केले आहे. रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार जीवनात अंगिकारत स्वत:चे जीवन यशस्वी करता येणार आहे.

  • मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी निर्णय घेतो आणि मग त्यांना योग्य ठरवितो.
  • जर तुम्हाला जलद चालायचे असेल तर एकटेच चला. जर तुम्ही दूरपर्यंत चालू इच्छित असाल तर सोबत घ्या.
  • लोखंडाला कुणीच नष्ट करू शकत नाही, परंतु त्याची स्वत:ची गंज त्याला नष्ट करू शकते. अशाचप्रकारे कुणीही व्यक्तीला नष्ट करू शकत नाही, परंतु त्याची स्वत:ची मानसिकता नष्ट करू शकते.
  • जीवनात उतार-चढाव आम्हाला पुढे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, कारण ईसीजीमध्ये सरळ रेषेचा अर्थ आम्ही जिवंत नाही, असा होतो.
  • लोक जे दगड तुमच्यावर फेकतात, ते एकत्र करा आणि त्यांचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
  • मी नेहमीच भारताच्या भविष्यातील शक्यतांविषयी आश्वस्त आणि अत्यंत उत्साही राहिलो आहे. हा अत्यंत अधिक शक्यता असणारा एक महान देश असल्याचे मला वाटते.
  • अत्यंत यशस्वी ठरलेल्या लोकांची मी प्रशंसा करतो. परंतु त्यांनी हे यश अत्यंत अधिक निर्दयपणे प्राप्त केले तर त्या व्यक्तीची मी प्रशंसा करू शकतो, परंतु त्याचा सन्मान करू शकत नाही.
  • शक्ती आणि धन माझे दोन्ही मुख्य हित नाहीत.
  • आपण जे वाचतो, ते सत्य आहे असे लोक अजूनही मानतात.

प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी

रतन टाटा यांना 2000 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर त्यांना महाराष्ट्र सरकारकडून 2023 मध्ये उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रतन टाटा यांना भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे.

रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार

            वर्ष          पुरस्कार

  • 2000      पद्मभूषण               (भारत सरकारकडून प्राप्त पुरस्कार)
  • 2004      मेडल ऑफ द ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे
  • 2008      पद्मविभूषण (भारत सरकारकडून प्राप्त पुरस्कार)
  • 2008      ओनररी डॉक्टर ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज
  • 2008      ओनररी डॉक्टर ऑफ सायन्स, आयआयटी, मुंबई
  • 2008      ओनररी डॉक्टरऑफ सायन्स, आयआयटी खडगपूर
  • 2008      ओनररी सिटिजन अवॉर्ड, सिंगापूर
  • 2016      कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ओनर, फ्रान्स
  • 2023      ओनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया
  • 2023      उद्योगरत्न, (महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त)

कल्पकता, दृढनिश्चयाचा महामेरु

रतन टाटा यांनी स्वत:च्या आयुष्यात यशाची अनेक शिखरं गाठली होती. देशाचा प्रत्येक उद्योजक, व्यावसायिक त्यांच्यासारखा यशस्वी व्यक्ती होण्याची कल्पना करत असतो. रतन टाटा हे उद्योगविश्वात असूनही अजातशत्रू होते. रतन टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी टाटा समुहात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी कंपनीच्या विविध स्तरांवर काम करून अनुभव प्राप्त केला. त्यांची कारकीर्द उद्योगाच्या विविध विभागांमध्ये अडचणींना सामोरी गेली, परंतु त्यांनी दूरदर्शीपणा आणि नेतृत्वाद्वारे उद्योगसमुहाला नवी उंची मिळवून दिली. 1991 मध्ये  त्यांनी समुहाची धुरा सांभाळली आणि टाटा समुहाला जागतिक स्तरावरील स्पर्धक म्हणून ओळख प्राप्त करून दिली.

रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समुहाने अनेक मोठी अधिग्रहणं केली, ज्यात 2000 मध्ये टेटलीचे अधिग्रहण सामील आहे. यामुळे टाटा ग्लोबल बेवरेजेजची निर्मिती झाली. 2007 मध्ये कोरस समुहाचे अधिग्रहण केल्याने टाटा स्टील जगातील सर्वात मोठ्या स्टील उत्पादक कंपन्यांमध्ये सामील झाली. तर 2008 मधील जग्वार लँड रोव्हरचे अधिग्रहण केल्यावर टाटा मोटर्सला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. 1996 मध्ये त्यांनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली. अध्यक्षपदावरून हटल्यावर टाटांनी टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्स समवेत अनेक कंपन्यांचे मानद अध्यक्षाचे पद कायम राखले. टाटा समुहाच्या विकास आणि जागतिकीकरण अभियानाने त्यांच्या नेतृत्वात वेग पकडला आणि नव्या शतकात मोठ्या कंपन्यांच्या अधिग्रहणांचे एक सत्र दिसून आले. टेटली 431.3 दशलक्ष डॉलर्स, कोरस 11.3 अब्ज डॉलर्स, जग्वार लँड रोव्हर 2.3 अब्ज डॉलर्स, ब्रूनर मेंड, जनरल केमिकल इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स आणि दैवू या कंपन्या 102 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आल्या होत्या.

नॅनो अन् इंडिका कार

टाटा मोटर्समध्ये रतन टाटा यांच्या पसंतीच्या प्रोजेक्टसमध्ये इंडिका ‘भारतात डिझाइन आणि निर्मित पहिले कार मॉडेल’ आणि नॅनो ‘जगातील सर्वात स्वस्त कार’ सामील होते. दोन्ही मॉडेल्ससाठी त्यांनी प्रारंभिक रेखाचित्र तयार केले होते. इंडिका कार हे व्यावसायिक यश ठरले, तर नॅनो कारला प्रारंभिक सुरक्षा मुद्दे आणि मार्केटिंगच्या चुकांमुळे आव्हानाला तोंड द्यावे लागले होते.

मदतकार्यात नेहमीच अग्रेसर : 26/11 पीडितांसाठी घेतले निर्णय

भारतात उद्योगपतींकडे फार चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. परंतु याला रतन टाटा निर्विवादपणे अपवाद ठरले. 26/11 च्य मुंबई हल्ल्यावेळी रतन टाटा यांनी जे काही केले ते कळल्यावर समस्त देशवासीयांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर अधिकच वाढला होता. मुंबईवर पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 60 तासांपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार केला, यात ताज हॉटेलचाही समावेश होता. ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसल्याचे कळताच टाटा यांनी जीवाची पर्वा न करता तेथे धाव घेतली. गोळीबार सुरू असताना 3 दिवस टाटा तेथे ठाण मांडून राहिले. त्यावेळी हॉटेलमधील स्टाफसोबत 300 अतिथी सुरक्षित राहतील हे टाटा यांनी सुनिश्चित केले.

पीडितांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

केवळ ताज हॉटेलमधील हल्ल्यात मारले गेलेल्या किंवा जखमी पीडितांना नव्हे तर अन्य पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना टाटा यांनी मदत केली. रतन टाटा हे हॉटेलच्या 80 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक स्वरुपात भेटले. ज्या कर्मचाऱ्यांचे पुटुंबीय मुंबईबाहेर राहत होते, त्यांना टाटा यांनी मुंबईत बोलाविले आणि त्यांना सर्व मदत पुरविली होती.

मानसिक आरोग्याची घेतली काळजी

कर्मचाऱ्यांना मदत मिळावी म्हणून केवळ 20 दिवसांमध्ये टाटांकडून एक नवा ट्रस्ट निर्माण करण्यात आला.  टाटा यांनी पीडितांच्या 46 अपत्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. मारले गेलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या परिवाराला 36 लाख ते 85 लाख रुपयांपर्यंतची भरपाई निश्चित केली. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या अंतिम पगाराइतकी रक्कम त्याच्या परिवारांना दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था रतन टाटा यांनी केली.

इतरांनाही केली मदत

दहशतवादी हल्ल्यातील पीडित रेल्वे कर्मचारी, पोलीस, सर्वसामान्य लोकांनाही त्यांनी भरपाई दिली. एका वृद्ध फेरीवाल्याच्या 4 वर्षीय नातीला 4 गोळ्या लागल्या होत्या. शासकीय रुग्णालयात मुलीच्या शरीरातून केवळ एकच गोळी बाहेर काढता आली होती. या मुलीच्या उपचाराकरता कितीही खर्च आला तरी करण्याचा निर्णय टाटा यांनी घेतला. समुहाने या मुलीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करविले आणि उपचारावर लाखो रुपये खर्च केले.

भारत-चीन युद्धामुळे प्रेमाला मुकले,ठरला होता विवाह : प्रेयसी-सोबतच्या ब्रेकअपचा किस्सा

भारत तसेच जागतिक स्तरावरचे उद्योजक रतन टाटा यांनी कधीच विवाह केला नव्हता. स्वत:च्या जीवनाविषयी ते फारसे बोलत नव्हते. पण काहीवेळी त्यांनी स्वत:चा परिवार आणि प्रेयसींबद्दल मन मोकळे केले होते. त्यांच्या एका प्रेमाचा किस्सा 1962 च्या भारत-चीनच्या युद्धाशी जोडलेला आहे. या युद्धामुळेच त्यांचा विवाह होता होता राहिला होता. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांनी अमेरिकेत जन्मलेल्या स्वत:च्या प्रेमकहाणीविषयी सांगितले होते. 50 च्या दशकाच्या अखेरीस आणि 60 च्या दशकाच्या प्रारंभी ते प्रेमात पडले होते. रतन टाटा यांना लॉस एंजिलिसमध्ये एका युवतीवर प्रेम जडले होते.

त्या काळात मी लॉस एंजिलिसमध्ये होतो. त्या युवतीसोबत विवाहाची तयारी करत होतो. त्याच काळात कामापासून ब्रेक घेत काही काळासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यामागील कारण माझी आजी होती. ती आजारी होती आणि तिला भेटण्याची माझी इच्छा होती.आजीला भेटण्यासाठी मी भारतात आलो. प्रेयसीला देखील सोबत भारतात येण्यास सांगितले होते. तो काळ 1962 च्या भारत-चीन युद्धाचा होता. युवतीचे आईवडिल भारतातील स्थितीवरून घाबरले होते आणि त्यांनी तिला माझ्यासोबत पाठविण्यास नकार दिला. अशाप्रकारे माझे हे नाते तुटल्याचे रतन टाटा यांनी मुलाखतीत सांगितले होते.

आईवडिलांच्या घटस्फोटामुळे त्रास

आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मला काही असहज करणाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले होते. परंतु त्यादरम्यान आजीने मला भावनात्मक स्वऊपात सावरले. मी वायोलिन वाजविणे शिकू इच्छित होतो, परंतु वडिलांनी पियानो शिकण्यास सांगितले. अमेरिकेतील कॉलेजमध्ये जाण्याची माझी इच्छा होती. परंतु वडिलांनी ब्रिटनला जाण्यावर जोर दिला. मी आर्किटेक्ट होऊ इच्छित होतो, परंतु त्यांनी मला इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यास सांगितले असे रतन टाटा यांनी मुलाखतीत नमूद केले होते. आजीमुळेच मी अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात गेलो, मॅकेनिकल इंजिनियरिंगमधून आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतल्यावर माझे वडिल नाराज झाले होते. त्या काळात आजीकडूनच भावनात्मक पाठबळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. 1868 मध्ये टाटा समुहाची स्थापना

टाटा समुहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती. ही भारताची सर्वात मोठी बहुदेशीय कंपनी आहे, या समुहाच्या 30 कंपन्या जगातील 100 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहेत. सध्या एन. चंद्रशेखरन याचे अध्यक्ष आहेत. टाटा सन्स टाटा कंपन्यांच्या प्रिंसिपल इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आणि प्रमोटर आहे. टाटा सन्सची 66 टक्के हिस्सेदारी टाटांच्या चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे. 2023 मध्ये टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण उत्पन्न 13.86 लाख कोटी रुपये होते. हा समुह 10 लाखांहून अधिक लोकांना थेट स्वऊपात रोजगार प्रदान करतो. या समुहाची उत्पादने सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकाळपासून रात्रीपर्यंत वापरली जातात.

टाटांचा वारसा कोण सांभाळणार : कनिष्ठ भावाची निवृत्ती : सावत्र बंधू मोठे दावेदार

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर आता अत्यंत शक्तिशाली टाटा समुहाचा वारसा कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित आहे. रतन टाटा यांनी स्वत:चा उत्तराधिकारी नियुक्त केला नव्हता. सध्या समुहातील सर्वात मोठी कंपनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आहेत. परंतु त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण टाटा ट्रस्ट असून त्याची धुरा टाटा परिवाराचे सदस्यच सांभाळत राहिले आहेत. निधनापूर्वी रतन टाटा हेच या ट्रस्टचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

13 लाख कोटी रुपयांचा महसूल असलेल्या टाटा समुहात या ट्रस्टची 66 टक्के हिस्सेदारी आहे. याच्या अंतर्गत येणाऱ्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये टाटा सन्सची 52 टक्के हिस्सेदारी आहे. टाटा समुहाच्या इतिहासात रतन टाटा यांनी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट दोन्हींचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली आहे. कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये 2022 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. ज्यानुसार एकाच व्यक्तीला दोन्ही पदांवर राहण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासकीय रचनेत बदल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते.

छोट्या बंधूची यापूर्वीच निवृत्ती

रतन टाटा यांचे कनिष्ठ बंधू जिमी टाटा मुंबईतच वास्तव्याला आहेत. परंतु 90 च्या दशकातच त्यांनी निवृत्ती घेतली आहे. टाटा सन्सच्या कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. त्यांनी देखील रतन टाटा यांच्याप्रमाणे विवाह केला नव्हता. निवृत्तीनंतर ते 2 बेडरुम असलेल्या फ्लॅटमध्ये राहतात. जिमी टाटा यांनी मागील 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून उद्योगविश्वापासून अंतर राखले आहे. टाटांच्या नव्या उद्योगांशी देखील ते जोडलेले नाहीत. अशा स्थितीत त्यांना टाटा ट्रस्टची धुरा सोपविली जाण्याची शक्यता कमीच आहे.

नोएल टाटा सर्वात मजबूत दावेदार

रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे कौटुंबिक संबंध आणि समुहाच्या अनेक कंपन्यांमधील भागीदारीमुळे टाटांचा वारसा पुढे नेण्यासाठी एक मजबूत दावेदार आहेत. नवल आणि सिमोन टाटा यांचे पुत्र नोएल हे ट्रेंट, वोल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळात ते सामील आहेत.

नवी पिढीही सक्रीय

नोएल टाटा यांची मुले लिआह, माया आणि नेविल हे अन्य प्रोफेशनल्स प्रमाणे कंपनीत काम करत आहेत. सर्वात मोठी मुलगी लिआह टाटाने स्पेनमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 2006 मध्ये त्यांनी ताज हॉटेल रिसॉर्ट्स अँड पॅलेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून कामास सुरुवात केली होती. सध्या त्या द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कनिष्ठ कन्या माया यांनी समुहाची फायनान्शियल सर्व्हिस कंपनी टाटा कॅपिलमध्ये विश्लेषक म्हणून काम सुरू केले होते. तर त्यांचे बंधू नेविल यांनी ट्रेंटमध्ये स्वत:च्या कारकीर्दीस प्रारंभ केला होता.

फोर्डकडून अवमान, जग्वार अन् लँड रोव्हर खरेदी करत केली परतफेड

टाटा मोटर्स भले सध्या ऑटोमोबाइल क्षेत्रात दिग्गज कंपनी असली तरीही एकेकाळी टाटा मोटर्सचे तत्कालीन सर्वेसर्वा रतन टाटा स्वदेशी कार टाटा इंडिकाला प्रारंभी चांगला प्रतिसाद न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णयही घेतला होता. याकरता फोर्ड मोटर्सचे अध्यक्ष बिल फोर्ड यांची त्यांनी भेट घेतली होती. परंतु फोर्ड यांनी त्यांचा अवमान केला होता. यामुळे तो व्यवहार होऊ शकला नव्हता. रतन टाटा अमेरिकेत झालेला अपमान गिळून भारतात परतले आणि मग त्यांनी टाटा मोटर्सला यशाची अशी उंची मिळवून दिली की अमेरिकन कंपनी फोर्ड मोटर्सकडून त्यांची प्रीमियम कार कंपनी जग्वार लँड रोव्हरच खरेदी केली. सध्या ही कंपनी विक्रीचा उच्चांक गाठत आहे.

टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय

1998 च्या दरम्यान टाटा मोटर्सची स्वदेशी कार टाटा इंडिका भारतीय बाजारपेठेत फारशी यशस्वी ठरत नव्हती. त्यावेळी अमेरिकन आणि जपानी कंपन्यांच्या कार्सला मोठी मागणी होती. अशा काळात रतन टाटा यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळातील लोकप्रिय अमेरिकन कंपनी फोर्ड मोटर्सला संभाव्य खरेदीदार म्हणून पाहिले होते.

बिल फोर्ड यांच्याकडून अवमान

1999 मध्ये रतन टाटा आणि त्यांची टीम फोर्ड मोटर्सचे अध्यक्ष बिल फोर्ड यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीदरम्यान फोर्ड यांनी अवमानकारक शब्द वापरले होते. ऑटोमोबाइल क्षेत्राविषयी फारशी माहिती नसताना तुम्ही या क्षेत्रात का उतरलात? टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकारच करत आहोत असे बिल फोर्ड यांनी सुनावले होते. फोर्ड यांच्याकडून झालेला अवमान पाहता रतन टाटा यांनी टाटा मोटर्स विकण्याचा विचार सोडून दिला. या अपमानामुळे दुखावलेले गेलेल्या रतन टाटा यांनी परिश्रमाला कल्पकतेची जोड देत टाटा मोटर्सला यश मिळवून दिले. त्यानंतर इंडिका वी2 अपडेटेड मॉडेल सादर करण्यासोबत सफारी, सुमो यासारख्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. वाहनांच्या निर्मितीत सुरक्षा आणि मायलेजवर जोर दिल्यावर टाटा मोटर्सने चमत्कारच केला.

फोर्डलाच घ्यावी लागली मदत

टाटा मोटर्स नवनवी भरारी घेत असताना 2008 साली अमेरिकेत आलेल्या मंदीमुळे फोर्ड मोटर्सची आर्थिक स्थिती बिघडली. त्याकाळी टाटा मोटर्सने उचललेले पाऊल जगाला चकित करणारे ठरले. टाटा मोटर्सने 2008 साली फोर्डची लक्झरी कंपनी जग्वार लँड रोव्हरला खरेदी केले. आता जग्वार लँड रोव्हर देशविदेशात दरवर्षी लाखो कार्सची विक्री करत आहे.

Advertisement
Tags :

.