विमानसेवेअभावी बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राचे नुकसान
राजकीय हस्तक्षेपाची फौऊंड्री क्लस्टरची मागणी : मुंबई, पुणे, चेन्नई विमानफेऱ्यांची गरज
बेळगाव : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर बेळगावचे औद्योगिक क्षेत्र अवलंबून आहे. परंतु काही दिवसांपासून बेळगाव-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रासह व्यवसाय, शिक्षण व इतर क्षेत्रांवरही होत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप करत बेळगाव-मुंबई विमानफेरी पूर्ववत करावी, अशी मागणी बेळगाव फौऊंड्री क्लस्टरतर्फे करण्यात आली आहे. अनेक बड्या कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये मुंबईस्थित आहेत. गुंतवणूकदार, निर्यातदार हे मुंबई येथे असल्यामुळे बेळगावच्या नागरिकांना नेहमी ये-जा करावी लागते. परंतु आता विमानसेवा बंद झाल्याने इतर शहरांना जाऊन मुंबई गाठावे लागत आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रावर 40 टक्के परिणाम जाणवू लागला आहे. बेळगावच्या मॅन्युफॅक्चरिंग, लघुउद्योग, ट्रेड तसेच इतर क्षेत्रांवर याचा थेट परिणाम होऊ लागला आहे. परदेशी गुंतवणूकदार विमानाने मुंबईमार्गे बेळगावला येत होते. परंतु यालाही आता खीळ बसली आहे.
विमानसेवा सुरळीत झाल्यास 10 ते 15 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. कनेक्टिव्हिटी कमी होत असल्याने बेळगावमधील उद्योग शेजारील कोल्हापूर येथे जात आहेत. बेळगाव हे फौऊंड्री, हैड्रोलिक, मशिनिंग या औद्योगिक क्षेत्रांसाठी ओळखले जाते. तसेच या ठिकाणी एकससारखा मोठा औद्योगिक प्रकल्प असल्यामुळे देशासह परदेशातील व्यवहारांवर विमानसेवेमुळे मर्यादा येत आहेत. बेळगावमध्ये येणारा 60 ते 80 टक्के व्यवसाय हा पुणे, मुंबई व चेन्नई येथून येणारा आहे. परंतु या शहरांच्या विमानसेवाच बंद झाल्याने आर्थिक कणा मोडला असल्याचे फौऊंड्री क्लस्टरने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेळगाव-मुंबई, बेळगाव-पुणे, बेळगाव-चेन्नई यासह इतर शहरांना नियमित सेवा सुरू झाल्यास रोजगार तर वाढेलच त्याचबरोबर परकीय गुंतवणूक वाढली जाणार आहे. ज्या प्रकारे हुबळी येथून पुणे व मुंबईला सेवा सुरू आहे, त्याचप्रकारे बेळगावमधूनही त्या सुरू ठेवाव्यात, यासाठी खासदार जगदीश शेट्टर व राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन बेळगाव फौऊंड्री क्लस्टरचे चेअरमन राम भंडारे यांनी केले आहे.