For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलपीजीचा तुटवडा-कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे औद्योगिक क्षेत्राला फटका

03:21 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
एलपीजीचा तुटवडा कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे औद्योगिक क्षेत्राला फटका
Advertisement

उद्यमबाग येथील अनेक कारखान्यांवर परिणाम : शिफ्टमध्ये होतेय घट

Advertisement

बेळगाव : एलपीजी सिलिंडरचा तुटवडा, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि स्थलांतरित मजुरांमुळे बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला जबर फटका बसला आहे. अनेक उद्योगांना याचा परिणाम सहन करावा लागत आहे. तीन शिफ्टमध्ये चालणारे कारखाने आता एक-दोन शिफ्टमध्ये चालविले जात आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास काही कारखाने बंद हाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इराण-अमेरिका-इस्त्रायल या देशांमधील युद्धाचा परिणाम भारतालाही सहन करावा लागला. एलपीजी गॅसचा पुरवठा मर्यादित स्वरुपात केला जात असल्याने औद्योगिक क्षेत्राला एलपीजी मिळणे अवघड झाले आहे. एलपीजीच्या तुटवड्यामुळे पावडर कोटिंग आणि मेटल प्रोसिसिंगसारख्या उद्योगांवर सर्वाधिक परिणाम झाला. हे उद्योग पूर्णपणे एलपीजीवर अलंबून असल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे सध्या असलेल्या ऑर्डर वेळेत देणेही शक्य नाही.

Advertisement

युद्धामुळे कच्च्या मालांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात स्टील तसेच इतर कच्च्या मालाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. कच्चा माल वाढल्याने उत्पादनाचा खर्च कैकपटीने वाढला आहे. एका वर्षात 10 ते 30 टक्के किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने शिफ्ट चालविणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तोटा कमी करण्यासाठी काही कारखान्यांनी शिफ्ट कमी केली आहे.

झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील अनेक मजूर पुन्हा आपापल्या गावी परंतु लागले आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता या संकटात भर घालत आहे. उद्यमबाग परिसरात दहा हजाराहून अधिक कामगार काम करीत आहेत. परंतु युद्ध, महागाईचा भडका, नोकरीची अनिश्चितता, कामाचे दिवस कमी होणे यामुळे परराज्यातील कामगार आपापल्या गावी परतत असल्याने उद्योग क्षेत्र हैराण झाले आहे. बेळगाव शहराचा आर्थिक कणा म्हणून औद्योगिक क्षेत्राकडे पाहिले जाते. परंतु हा आर्थिक कणाच आता डळमळू लागला आहे. काम कमी झाल्याने तीन शिफ्टमध्ये चालणारे कारखाने आता एक दोन शिफ्टवर सुरु आहे. यामध्ये मध्यम व लघू उद्योग सर्वाधिक भरडले जात आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एलपीजीचा पुरवठा सुरळीत करा

बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला जागतिक अस्थिरता, स्टील व इतर कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, एलपीजी गॅसचा तुटवडा याचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारला पत्र पाठवून एलपीजीचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु वेळेवर उपाययोजना न केल्यास औद्योगिक क्षेत्राची अवस्था अजून बिकट होणार आहे.

-प्रभाकर नागरमुन्नवळ्ळी, (अध्यक्ष बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स)

Advertisement
Tags :

.