For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Indrayani River Flood "वारकऱ्यांनो इंद्रायणीला पूर आलाय, आळंदीत प्रवेश बंद आहे" प्रशासनाचे आषाढीच्या पार्श्वभूमीवर आवाहन

06:24 PM Jul 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
indrayani river flood   वारकऱ्यांनो इंद्रायणीला पूर आलाय  आळंदीत प्रवेश बंद आहे  प्रशासनाचे आषाढीच्या पार्श्वभूमीवर आवाहन
Advertisement

राज्यात गेल्या २४ तासांत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पूर्णत: पाण्यात बुडाले आहेत. आषाढी एकादशी तोंडावर असताना पूरस्थिती उद्भवल्यामुळे आळंदीच्या वाटेवरील वारकऱ्यांना जिथे आहे तिथे थांबण्याची वेळ आली आहे. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल सध्या पाण्याखाली गेले आहेत. आषाढी वारी २०२६ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना सध्या आळंदीकडे येणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

आळंदी शहरालाही फटका

Advertisement

सततच्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा फटका आळंदी शहराच्या संपर्क व्यवस्थेलाही बसला आहे. शहराला जोडणारे चारही प्रमुख पूल जलमय झाल्याने आळंदीत प्रवेश करणे सध्या धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने हे मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहराला पाण्याचा विळखा बसला आहे.

प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, सोशल मीडियावरील किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन

इंद्रायणीला आलेल्या पूरामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू असून, नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. मात्र, यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रथम स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.