Indrayani Kundamla Bridge Collapse: कुंडमळ्यात पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत कोल्हापूरच्या बापलेकाचा मृत्यू!
काल 'फादर्स डे' लाच या पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ
कोल्हापूर : काल पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेते चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी आहेत. आतापर्यंत 18 जणांना वाचविले असून अनेकजण नदीतून वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडी येथील रोहित सुधीर माने (वय 35) व त्यांचा चार वर्षांचा मुलगा विहान रोहित माने या दोघां बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल 'फादर्स डे' लाच या पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात रोहित यांची पत्नी शमिका या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच रोहितचे आई-वडिल तात्काळ पुण्याकडे रवाना झाले आहेत. दोन्ही पिता-पुत्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने उजळवाडी गावावर शोककळा पसरली.
मूळचे उजळाईवाडीचे रोहित हे उत्तम क्रिकेटपटू होते. त्यांनी आजवर अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. सध्या रोहित पुण्यात एका आयटी कंपनीत जॉबला होते. कामानिमित्त ते पत्नी आणि मुलासोबत चिंचवड येथे स्थायिक झाला होते. उजळवाडीतील सरकार चौक येथे रोहित यांचे घर असून त्याचे वडील एका मेडिकल कंपनीत कार्यरत असल्याची माहिती मिळत आहेत. मुलाच्या आणि नातवाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांना जोरदार धक्का बसला असून ते पुण्यात दाखल झाले आहेत.