For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इंदोर बटाटा 200 रुपयांनी वाढ : टोमॅटो भाव गडगडला

06:01 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंदोर बटाटा 200 रुपयांनी वाढ   टोमॅटो भाव गडगडला
Advertisement

कोथिंबीर दरातही घसरण : कांदा-बटाटा-रताळी-गूळ दर स्थिर : पालेभाज्यांचे दरही टिकून

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कर्नाटक नवीन कांदा, महाराष्ट्र जुना कांदा, पांढरा कांदा, आग्रा बटाटा, बेळगाव जवारी बटाटा, रताळी, गूळ व लसूण यांचा दर प्रति क्विंटल टिकून आहे. तर इंदोर बटाट्याचा भाव 200 रुपयांनी वाढला आहे. एपीएमसी भाजीमार्केटमध्ये पालेभाज्यांचे दर टिकून आहेत. कोथिंबीर दरात घसरण झाली असून शेकडा भाव 200 रुपयांनी कमी झाला आहे. तर टोमॅटो भाव गडगडला आहे. टोमॅटो प्रती ट्रेचा भाव 150 पासून 250 रुपये झाला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो प्रतिकिलो 10 ते 15 रुपयेप्रमाणे विक्री करीत आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

शनिवार दि. 24 रोजी एपीएमसी मार्केट यार्डमधील कांदा मार्केटमध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्र कांद्याच्या सुमारे 6 ट्रक कांदा आला होता. तर कर्नाटकातील नवीन कांद्याच्या सुमारे 250 ट्रका आवक आली होती व कर्नाटक जुना कांदा केवळ 1 ट्रक आवक आली होती. पांढऱ्या कांद्याच्या 6 ट्रका आल्या होत्या. आग्रा बटाट्याच्या 4 ट्रक तर इंदोर बटाट्याच्या 8 ट्रका विक्रीसाठी आल्या होत्या. त्यामधील इंदोर बटाट्याचा भाव प्रति क्विंटलला 200 रुपये वाढला आहे. कारण इंदोर बटाट्याची आवक अंतिम टप्प्यात आली आहे. हा बटाटा शीतगृहात साठवून ठेवलेला होता. आणखी एक महिना पुरेल इतकाच साठा शीतगृहामध्ये आहे. त्यामुळेच आवकेत कमतरता भासत आहे. येत्या काही दिवसात इंदोर बटाट्याचा भावदेखील वाढण्याची शक्यता आहे. इंदोर बटाटा भाव क्विंटलला 1800 पासून 2200 रुपये, आग्रा बटाटा भाव 800 पासून 1400 रुपये, महाराष्ट्र कांदा दर 4000 पासून 5500 रुपये, कर्नाटक नवीन कांदा दर 3500 पासून 5600 रुपये, पांढरा कांदा दर 3000 पासून 5000 रुपये भाव झाला आहे, अशी माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.

मार्केट यार्डमधील बटाटा, रताळी मार्केटमध्ये तालुक्यातील रताळ्याची सुमारे 20 हजार पिशव्यांची आवक विक्रीसाठी आली होती. तर जवारी बटाटा आवक अंतिम टप्प्यात आल्याने केवळ 800 पिशव्याच विक्रीसाठी आल्या होत्या. सध्या रताळी दिल्ली, मुंबई, पुणे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आदी ठिकाणी निर्यात होत आहेत. तर जवारी बटाटा बेळगाव परिसरातील किरकोळ बाजारात आणि गोवा या ठिकाणी निर्यात होत आहेत. सध्या रताळी आणि जवारी बटाट्याचा दर आठ दिवसापासून टिकून आहे. रताळी दर प्रतिक्विंटल 500 पासून 2200 रुपये तर जवारी बटाटा दर 300 पासून 2500 रुपयेप्रमाणे भाव झाला आहे. आणखी महिन्याभरात जवारी बटाटा आवक जवळपास संपणार आहे, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र नवीन कांदा, इंदोर नवीन बटाटा जानेवारीत येणार

सध्या महाराष्ट्रातून साठवून ठेवलेला जुना कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. त्याचप्रमाणे इंदोरमध्ये जानेवारी महिन्यात काढलेला इंदोर बटाटा शीतगृहामध्ये साठवून ठेवण्यात येतो व वर्षभर मागणीनुसार बाजारपेठेमध्ये विक्रीला पाठवतात. सध्या शीतगृहेदेखील 80 टक्के रिकामी झाली आहेत. केवळ 20 टक्केच इंदोर बटाटा शीतगृहामध्ये आहेत. त्यामुळे इंदोर बटाटा आवक घटत चालली आहे. त्यामुळेच भावदेखील वाढत आहे. तसेच महाराष्ट्रमध्ये महिन्यामध्ये नवीन कांदा काढणी करून तोसुद्धा साठवून ठेवला जातो. दर वाढेल तेव्हा तो कांदा बाहेर काढला जातो. सध्या जुना महाराष्ट्र कांदा देखील आटोक्यात आला आहे. यापूर्वीच कांद्याची लागवड केली असून हा कांदा जानेवारी महिन्यामध्ये काढणीला सुरुवात होते. यावेळी कांद्याचा भाव आटोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.

एपीएमसी भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत. कोथिंबीर दराचा भाव शेकडा दोनशे रुपये आणि कमी झाला आहे. तर टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. प्रती ट्रेचा भाव 150 पासून 250 रु. भाव होत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण भाजीमार्केटमध्ये टोमॅटो आवक मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळेच टोमॅटोचा दर गडगडला आहे व इतर भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत. बेळगावमधून दररोज हा भाजीपाला गोवा व कोकण परिसरात निर्यात होतो. तसेच उर्वरित भाजीपाला बेळगाव परिसरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातो, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.