For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून इंडोनेशिया घेणार ‘ब्राम्होस’

06:58 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून इंडोनेशिया घेणार ‘ब्राम्होस’
Advertisement

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधीही करार, भारताशी 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या, मैत्री होणार दृढ

Advertisement

वृत्तसंस्था / जकार्ता (इंडोनेशिया)

भारताकडून इंडोनेशिया ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेणार आहे. तसेच, भारतामधील निवडणुकांमध्ये उपयोगात आणल्या जास्त असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधीही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला आहे. ही यंत्रे इंडोनेशिया विकत घेणार आहे. त्याचप्रमाणे, तंत्रज्ञान विकास, व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती आणि जनसंपर्क या क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

Advertisement

दोन्ही देशांनी संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने विविध अत्याधुनिक संरक्षण साधने विकसीत करणार आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ सूत्रानुसार हे सहकार्य होणार आहे.

दुर्मिळ धातू क्षेत्रात सहकार्य

इलेक्ट्रॉनिक आणि वाहन निर्मितीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ‘दुर्मिळ धातू’ निर्मिती आणि पुरवठा संबंधातही दोन्ही देशांमध्ये महत्वाचा करार करण्यात आला. या करारानुसार भारत इंडोनेशियामध्ये दुर्मिळ धातूंपासून चुंबक निर्माण करण्यास तांत्रिक साहाय्य करणार आहे.  तसेच, खनिजे आणि पोलाद निर्मितीसाठीही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी आणि आर्थिक सहकार्य दृढ व्हावे, हे सुनिश्चित केले जाणार आहे.

सागरी सुरक्षा सामंजस्य करार

सागरी सुरक्षेसंबंधात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील तटरक्षक दलांमध्ये समन्वय वृद्धिंगत करणे आणि मलाक्का सामुद्रधुनी व्यापारासाठी आणि जलवाहतुकीसाठी मुक्त ठेवण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली आहे. मलाक्काची सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे.

आरोग्य, कृषी, आपदा व्यवस्थापन

आरोग्य, कृषी आणि आपदा व्यवस्थापन क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील. आरोग्यसेवकांची आपूर्ती, आपदा व्यवस्थापन आणि पुनर्वसन क्षेत्रात एकमेकांच्या आवश्यकता पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इंडोनेशियाची अन्न सुरक्षा वाढावी, यासाठी भारत त्या देशाला गव्हाचे 100 टन बियाणे पुरविणार आहे. या संबंधीच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

शिक्षण आणि संस्कृती

भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) इंडोनेशियाच्या सिंघसारी विशेष आर्थिक क्षेत्रात आपली एक शाखा स्थान करणार आहे. भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी हा एक महत्वाची उपलब्धी आहे. हे वर्ष भारताचे महाकवी रविंद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशिया भेटीचे 100 वे वर्ष आहे. या निमित्त दोन्ही देश संयुक्तपणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. इंडोनेशियातील ‘प्रंबानन मंदीर संकुला’च्या संवर्धनासाठी भारत इंडोनेशियाला साहाय्य करणार आहे.

इतरही अनेक करार

डिजिटल तंत्रज्ञान विकास, तंत्रवैज्ञानिक संशोधन, डिजिटल व्यापार संवर्धन, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा विकास करणे, आदी क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाचे करार करण्यात आले. तसेच अवकाश संशोधन, गुप्त माहितीचे आदानप्रदान, दोन्ही देशांमधील जनतेत जवळीक निर्माण करण्यासाठी योजना आदी विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देश हातात हात घालून काम करतील, असे निर्धारीत करण्यात आले. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात पुरातन काळातासून जवळीकीचे सांस्कृतिक संबंध आहेत. ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच आयात-निर्यात वाढविणे, आर्थिक सहकार्य, गुंतवणूक आणि इतर क्षेत्रांमध्येही एकमेकांना साहाय्य करण्याचे ठरविण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च पुरस्कार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाने त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार ‘बिनतांग आदीपूर्ण’ या संज्ञेने परिचित आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मंगळवारी एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. माझा हा सन्मान भारतातील सर्व 140 कोटी लोकांना भूषणास्पद आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यात पुढाकार घेतल्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, अशी प्रशंसा या कार्यक्रमात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अनेक देशांकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त केला आहे.

भारतीय समाजाकडून स्वागत

इंडोनेशियातील भारतीय वंशाच्या नागरीकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारताच्या प्रगतीत इंडोनेशियातील भारतीय वंशाच्या नागरीकांच्या सहभागाची त्यांनी प्रशंसा केली.

कोणते झाले करार...

ड प्रभावी आणि मारक ब्राम्होस क्षेपणास्त्र यंत्रणा भारत इंडोनेशियाला पुरविणार

ड अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी दोन्ही देश एकमेकांना साहाय्य करणार

ड डिजिटल तंत्रज्ञान आणि दूरसंचार संशोधनात दोन्ही देशांचे संयुक्त प्रयत्न

ड दुर्मिळ धातूंचे उत्खनन, शुद्धीकरण आणि पुरवठा या क्षेत्रात महत्वाचा करार

ड भारतीय व्यवस्थापन संस्था इंडोनेशियात आपला शाखा कँपस स्थापन करणार

ड रविंद्रनाथ टागोर यांच्या इंडोनेशिया भेटीची शताब्दी साजरी केली जाणार

ड भारताकडून इंडोनेशिया इलेक्ट्रॉािrनक मतदान यंत्रे खरेदी करण्यासाठी सज्ज

ड मलाक्का सामुद्रधुनी व्यापारासाठी मुक्त राखण्यासाठी दोन्ही देश आहेत सज्ज

Advertisement
Tags :

.