‘अन्नभाग्य’मधून इंदिरा आहार किट
अतिरिक्त 5 किलो तांदळाऐवजी वितरण : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 61.19 कोटी रुपयांची तरतूद
बेंगळूर : अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारक कुटुंबांना अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त 5 किलो तांदळाऐवजी ‘इंदिरा आहार किट’ वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात एकूण 1,26,15,815 रेशनकार्डे आहेत. एकूण 4,48,62,192 जणांना इंदिरा आहार किटचा लाभ होईल. इंदिरा आहार किटमध्ये 2 किलो तूरडाळ, 1 किलो खाद्यतेल, 1 किलो साखर आणि 1 किलो मीठ यांचा समावेश आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत दिल्या जणाऱ्या अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या मोबदल्यात आहार किट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेकरिता 61.19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एका रेशनकार्डात एक किंवा दोन सदस्य असतील तर त्यांना अर्धा किलोचे किट दिले जाईल. तीन किंवा चार सदस्य असतील तर एक किलोचे किट आणि 5 पेक्षा जास्त सदस्य असतील तर दीड किलोचे किट देण्यात येईल, असेही मुनियप्पा यांनी सांगितले.
अवैध प्रकार रोखण्यासाठी निर्णय : एच. के. पाटील
अन्नभाग्य योजनेतील तांदळाची अवैध वाहतूक, चोरी आणि काळाबाजार होत असल्याने इंदिरा आहार किट वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 61.19 कोटी रुपये खर्चुन बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त तांदूळ वितरण करण्यासाठी अर्थसंकल्पात 64.26 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अनुदानापैकी 61.19 कोटी रु. खर्चातून आहार किट वितरण केले जाईल, असे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.