इंडिगो एअरबसचा 2,900 कोटींचा करार
सिटीबँकेसोबतच्या करारामधून 8 नवीन विमाने खरेदी करणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंडिगोने विमानांच्या खरेदीसाठी 328 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,900 कोटी रुपये) किमतीचा मोठा आर्थिक करार केला आहे. सदरचा करार एअरलाइनने सिटीबँकसोबत केला आहे. या रकमेतून इंडिगो एअरबसकडून आठ नवीन नॅरो-बॉडी विमाने खरेदी करणार आहे.
या कराराचे वैशिष्ट्या म्हणजे, विमानांच्या खरेदीसाठी इंडिगोला मिळालेल्या वित्तपुरवठ्याला बेल्जियमची सरकारी निर्यात पतपुरवठा संस्था ‘क्रेडेन्डो’ने विमा संरक्षण दिले आहे. हा जगातील पहिला विमानचालन वित्तपुरवठा करार आहे, ज्यामध्ये क्रेडेन्डोने विमा संरक्षण दिले आहे. यासोबतच, हा गिफ्ट आयएफएससीच्या माध्यमातून झालेला पहिला विमान वित्तपुरवठा करार आहे, ज्याला निर्यात पतपुरवठा संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या करारामध्ये सिटीबँकने एकमेव कर्जदाता आणि वित्तपुरवठा व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.
उपकंपनीमार्फत वित्तपुरवठा करार
विमान खरेदीसाठी इंडिगोने सिटीबँकेसोबत केलेला वित्तपुरवठा करार, त्यांची उपकंपनी इंटरग्लोब एव्हिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएफएससी मार्फत करण्यात आला. कंपनीच्या मते, या करारामुळे त्यांना आपल्या विमानांची संख्या वाढवण्यासाठी आणि नवीन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी दीर्घकालीन निधी मिळवणे शक्य होईल. याशिवाय, त्यांना निधीसाठी एकापेक्षा जास्त पर्यायांचा लाभ मिळेल आणि ते आपल्या गरजेनुसार एक चांगली आर्थिक प्रणाली तयार करू शकतील.
सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी के. बालसुब्रमण्यन म्हणाले की, हा करार तयार करण्यासाठी सिटीचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वित्तपुरवठ्यातील कौशल्य, क्रेडेन्डोचा क्रेडिट विमा आणि इंडिगोच्या गिफ्ट आयएफएससी प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे.
2023 मध्ये 500 विमानांची ऑर्डर
इंडिगोचे मुख्य विमान खरेदी आणि वित्त अधिकारी रियाझ पिरमोहम्मद म्हणाले की, सिटी, क्रेडेन्डो आणि एअरबस यांच्यासोबतची भागीदारी कंपनीला तिच्या वाढत्या एअरबस विमानांच्या ताफ्यासाठी निधीचा एक स्पर्धात्मक स्रोत उपलब्ध करून देते. इंडिगोने 2023 मध्ये एअरबसच्या ए320 फॅमिलीच्या 500 नॅरो-बॉडी विमानांच्या ऑर्डरची घोषणा केली होती.
