इंडिगो प्रवाशांना देणार 10 हजारांपर्यंतचे व्हाउचर
विमानोड्डाण रद्दचा फटका बसलेल्यांना दिलासा : केंद्र सरकारने दबाव आणल्यानंतर कंपनीची नरमाई
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना सर्वात जास्त समस्यांना तोंड द्यावे लागले. 2 डिसेंबरपासून इंडिगोची शेकडो उड्डाणे रद्द केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. यानंतर, डीजीसीएने एअरलाइनवर कठोर कारवाई केली आहे. आता, 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्यामुळे इंडिगोने प्रवाशांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. सरकारी नियमांनुसार प्रभावित प्रवाशांना 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत भरपाई मिळेल, असे कंपनीने गुरुवारी जाहीर केले.
सर्वात जास्त प्रभावित प्रवाशांसाठी 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त प्रवास व्हाउचर जारी करण्याची घोषणा इंडिगो एअरलाइनने केली आहे. ज्या प्रवाशांच्या प्रवास योजना अचानक बदलल्या गेल्या आणि ज्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली त्यांच्यासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा दिलासा मानला जातो. या ट्रॅव्हल व्हाउचरचे खास वैशिष्ट्या म्हणजे ते पुढील 12 महिन्यात कधीही वापरता येईल. भारतातील कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय इंडिगो फ्लाइटसाठी प्रवासी हे व्हाउचर वापरू शकतात.
कोणाला मिळणार ट्रॅव्हल व्हाउचर?
ज्या प्रवाशांना प्रवास अनेक वेळा बदलावा लागला, म्हणजेच ज्यांच्या फ्लाइट वारंवार बदलल्या गेल्या किंवा ज्यांना विमानतळावर दीर्घकाळ वाट पाहावी लागली अशा प्रवाशांना 10,000 चे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जाईल, असे इंडिगोने सांगितले. भरपाई आणि व्हाउचर क्लेम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाइल नंबरवर पाठवलेला संदेश तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डीजीसीए नियमांनुसार भरपाईची रक्कम
नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भरपाईची रक्कम दिली जाईल. एअरलाइनमुळे ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत त्यांना नियमांनुसार भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे इंडिगोने स्पष्ट केले. भरपाईची रक्कम फ्लाइटचे अंतर, तिकीट वर्ग आणि प्रवाशाला होणारी गैरसोय यावर आधारित असणार आहे. प्रवाशांचे आर्थिक नुकसान आणि अनावश्यक गैरसोय कमी करणे हा यामागील उद्देश आहे. रद्द केलेल्या उड्डाणांमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीला खेद असून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याची काळजी घेतली जाईल असे इंडिगोने निवेदनातून स्पष्ट केले आहे.