इंडिगो बाजारभांडवल मूल्यात अग्रेसर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगो ही बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये आघाडीवरची हवाई कंपनी बनली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये कंपनीच्या समभागाने शेअर बाजारात चांगलीच तेजी अनुभवली आहे. सध्याचे कंपनीचे बाजारभांडवल मूल्य 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हे मूल्य इतर जागतिक हवाई कंपन्या डेल्टा एअरलाईन आणि रॅनेयर होर्ल्डिंग्ज यांच्यापेक्षा अधिक आहे.
समभागाची कामगिरी
इंडिगो कंपनीचे समभाग यावर्षी भारतीय शेअरबाजारात जवळपास 13 टक्के इतके वधारले आहेत. तसे पाहता भारतीय शेअर बाजारामध्ये यावर्षी अस्थिरताच अधिक होती. या अस्थिरतेच्या काळातही इंडिगोने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. यावर्षी निफ्टी निर्देशकांची कामगिरी पाहता 6 टक्के घसरणच आतापर्यंतच्या कालावधीत दिसून आली आहे.
हवाई क्षेत्रात अधिक हिस्सेदारी
भारतातील सर्वाधिक वाटा उचलणारी कंपनी म्हणून हवाई कंपनी इंडिगोचा उल्लेख केला जातो. भारतीय विमान वाहतुकीमध्ये इंडिगोचा वाटा जवळपास 62 टक्के इतका आहे. विमान सेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या या कंपनीची आर्थिक स्थितीही उत्तम अशीच आहे. या दोहोचा परिणाम अर्थातच कंपनीच्या समाभागावर शेअरबाजारात सकारात्मक पहायला मिळतो आहे. कोरोनाच्या काळामध्ये कंपनीला अनेक आर्थिक आव्हाने स्वीकारावी लागली आहेत. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 987 कोटींचा तोटा सहन करावा लागला.
कामगिरीत सुधारणा अपेक्षीत
तज्ञांच्या अंदाजानुसार इंडिगोची कामगिरी पुढील काळात अधिक चांगली असू शकते. विमानाचे प्रवासशुल्क, कच्च्या तेलाच्या किंमतीचा फायदा उठवत चौथ्या तिमाहीमध्ये चांगला नफा कंपनी प्राप्त करु शकते. कंपनीच्या ताफ्यात सध्याला 439 विमाने आहेत. यामध्ये आणखीन नव्या 50 विमानांचा समावेश केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.