इंडिगो विमान संख्या, कर्मचारी वाढवण्यावर ठाम
विमान संख्येत दुप्पटीने करणार वाढ : 6 हजार जणांची होणार भरती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वात मोठी हवाई उद्योग क्षेत्रातील कंपनी इंडिगो लवकरच आपल्या विस्तार योजनेला सुरुवात करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये दर आठवड्याला एक विमान ताफ्यात सामील केले जाणार आहे. याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जवळपास 6हजार कर्मचाऱ्यांना नव्याने भरती करून घेतले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.
पुढील आर्थिक वर्षात विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याला भारतीय बाजारामध्ये इंडिगोचा विमान प्रवाशांच्या बाबतीमध्ये वाटा हा 60 टक्केपेक्षा अधिक आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत कंपनीकडे जवळपास 366 विमाने आहेत. आर्थिक वर्ष 2013 च्या शेवटीपर्यंत केवळ 304 विमानांचा ताफा कंपनीकडे होता.
भारतातील आघाडीवरची कंपनी
हवाई उद्योग क्षेत्रातील कंपनी इंडिगोने सध्याला 960 विमानांची ऑर्डर दिली आहे. विमान सेवेत पाहता भारतातील सर्वात मोठी हवाई कंपनी म्हणून इंडिगोचा उल्लेख होतो. 350 हून अधिक विमानांची देशभरातील विविध ठिकाणी दररोज ये-जा होत असते. या अंतर्गत पाहता कंपनी दररोज 2000 अधिकहून विमान फेऱ्या करत असल्याचेही समोर आले आहे. यामध्ये 85 विमाने देशांतर्गत पातळीवर कार्यरत असून 30 हून अधिक विमाने आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा प्रदान करतात. या क्षेत्रातील आणखीन एक कंपनी अकासा एअर यांच्याकडे सध्याला 24 विमाने आहेत, त्यामध्ये नजिकच्या काळामध्ये 202 विमानांची भर पडणार आहे.
विमान सेवेत भारत होणार तिसरा मोठा देश?
मुंबई : विमानातील प्रवासी बैठक संख्येच्या बाबतीत आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारत हा तिसरा सर्वात मोठा देश राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हवाई विमानातील बैठक क्षमतेच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि चीन हे दोन देश सध्याच्या अवस्थेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे मोठे देश आहेत.
जागतिक वाहतूक संबंधित आकडेवारी सादर करणाऱ्या ओएजी या संस्थेने यासंदर्भातला अंदाज नुकताच वर्तवला आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जपान, स्पेन, इंग्लंड, इटली, जर्मनी, इंडोनेशिया आणि टर्की या देशांना भारत मागे टाकू शकतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये विमानातील बैठक संख्येच्या बाबतीत दहा टक्के वाढ नोंदवली जाऊ शकते. अशा प्रकारे जर का अंदाजाप्रमाणे कामगिरी पार पाडली गेली तर भारत हा अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनणार आहे. अमेरिका 31 कोटी विमानातील प्रवासी बैठक संख्येसह आघाडीवर असून चीन 24 कोटी 20 लाख प्रवासी बैठक संख्येसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक स्तरावर 8 व्या स्थानी इंडिगो
जागतिक स्तरावर विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये भारताची इंडिगो ही आठव्या क्रमांकावर आहे. 2025 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 9.7 टक्के इतकी विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज इंडिगोने वर्तवला आहे. 32.64 दशलक्ष बैठक क्षमतेचे लक्ष यादरम्यान गाठले जाणार असल्याचेही बोलले जात आहे.