‘इंडिगो’चे विमान तातडीने उतरविले
बाँबच्या धमकीचा संदेश पाठविणाऱ्याला अटक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
‘इंडिगो’ या प्रवासी विमान कंपनीचे एक विमान अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले आहे. हे विमान सौदी अरेबियातील मदीना येथून हैद्राबाद येथे निघाले होते. मात्र, या विमानात बाँब पेरण्यात आला आहे, अशी धमकी ईमेल वरुन देण्यात आल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून ते अहमदाबादच्या विमानतळावर गुरुवारी दुपारी उतरविण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. विमान उतरविल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, बाँब आढळून आला नाही. त्यामुळे प्रवाशांचा ताण संपला आहे.
विमानात बाँब ठेवण्यात आला आहे, हा संदेश मिळताच विमान अहमदाबाद येथे उतरविण्याचा संदेश वैमानिकाला देण्यात आला. या विमानात 120 प्रवासी होते, अशी माहिती देण्यात आली. अहमदाबाद विमानतळालाही सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविली. विमान उतरल्यानंतर त्यातील सर्व प्रवाशांना त्वरित विमानाबाहेर काढण्यात आले. नंतर विमान सुरक्षित स्थळी नेऊन त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. तथापि, विमानात काहीही धोकादायक वस्तू सापडली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. प्रवासी विमान तातडीने उतरविण्याची ही गेल्या तीन महिन्यांमधील दुसरी महत्वाची घटना आहे.
सर्व प्रवासी भारतीय
या विमानातले सर्व प्रवासी भारतीय आहेत. ते सर्व सुखरुप आहेत. अहमदाबाद विमानतळावर उतरविण्यात आल्यानंतर अन्य विमानाने त्यांना हैद्राबादला पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. सर्व प्रवासी सुखरुप होते. तसेच ही बाँबची धमकी खोडसाळपणाने देण्यात आली होती, हे ही स्पष्ट झाले आहे.
संशयित प्रवाशाला अटक
बाँबची ही धमकी विमानातीलच एका प्रवाशाने दिली होती, असा संशय आहे. या संशयित प्रवाशाला विमान उतरविल्यानंतर तातडीने अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. हा घातपाताचा प्रयत्न होता काय, याचीही माहिती घेतली जात आहे. धमकी देणाऱ्या प्रवाशाची कोणतीही माहिती सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात आलेली नाही, असेही प्रतिपादन पोलिसांनी केले आहे.