For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिगो विमानसेवेचा सावळागोंधळ

10:30 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिगो विमानसेवेचा सावळागोंधळ
Advertisement

प्रवाशी पोहोचले बेळगावला, मात्र त्यांच्या बॅगा व इतर साहित्य बेंगळूरमध्येच

Advertisement

बेळगाव : इंडिगो विमानसेवेच्या सावळागोंधळामुळे बेळगावातील प्रवाशांची निष्कारण गैरसोय झाली. या प्रवाशांचे साहित्य विमानातून न आणता ते बेंगळूरमध्येच ठेवण्यात आले असून बेळगावला आल्यानंतर प्रवाशांना याची कल्पना देण्यात आली. ही धक्कादायक माहिती कळताच प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी याबाबत चौकशी करता समर्पक उत्तर न मिळाल्याने त्यांच्या संतापात भर पडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, इंडिगोच्या विमानसेवेचा लाभ घेणारे 15 हून अधिक प्रवासी बेंगळूरहून बेळगावसाठी येण्यासाठी निघाले. विमान बेळगावला आल्यावर प्रवाशांनी आपल्या बॅगांची चौकशी केली असता तुमच्या बॅगा या विमानातून आल्या नसून व तुमचे सर्व साहित्य उद्या येईल, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांना धक्काच बसला आणि त्यांनी विमानतळावरील कर्मचारी आणि व्यवस्थापकांकडे चौकशी केली. परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ते अधिकच संतप्त झाले.

दरम्यान याच विमानातून काही परदेशातील विद्यार्थी बेळगावला आले. त्यांच्या अवजड बॅगा याच विमानातून आणण्यात आल्या. त्याच कारणास्तव विमानात नेण्यात येणाऱ्या साहित्याच्या वजन मर्यादेची अट लक्षात घेऊन बेळगावच्या या प्रवाशांच्या या बॅगा सदर विमानातून पाठविण्यात आल्या नाहीत, हे अत्यंत निषेधार्ह आणि खेदजनक आहे, अशी माहिती या विमानातून आलेल्या एका उद्योजकांने ‘तरुण भारत’ला दिली. दरम्यान या प्रवाशांपैकी काही जणांना मधुमेह आणि बीपीची औषधे घ्यावी लागतात, त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे, घरच्या आणि गाडीच्या किल्या यासुद्धा त्याच बॅगांमध्ये असल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत आणखीनच भर पडली. या प्रवाशांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा करूनही त्यांना कोणतेच उत्तर मिळाले नाही.

Advertisement

वजन अधिक झाल्याने काही बॅगा ठेवण्यात आल्या

दरम्यान ‘तरुण भारत’ प्रतिनिधीने बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराज यांच्याशी संपर्क साधता, त्यांना या प्रकाराबद्दल काय माहितीच नव्हती. ‘तरुण भारत’ने याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी विमानतळावर चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानामध्ये नेण्यात येणाऱ्या साहित्याचे वजन अधिक झाल्याने काही बॅगा ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व बॅगा उद्यापर्यंत बेळगावला येतील. प्रथम त्या दिल्लीला पाठवून दिल्लीतून येणाऱ्या विमानाची आसनक्षमता व वजनक्षमता अधिक असल्याने दिल्लीहून या बॅगा येतील आणि त्या बॅगा त्यांच्या घरपोच पोहोचविल्या जातील, असे त्यागराज यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कोण देणार?

प्रवाशांना कल्पना न देता इंडिगो विमानसेवेने परस्पर निर्णय घेतल्याने प्रवाशांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याबद्दल वरिष्ठांपर्यंत ही बाब पोहोचविण्याचा निर्णय काही जणांनी घेतला आहे. प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कोण देणार? असाही प्रश्न त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.