स्वदेशी ‘अनंत शस्त्र’ करणार सीमेचे रक्षण
सहा नवीन एके-630 हवाई संरक्षण तोफा प्रणाली खरेदी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘अनंत शस्त्र’ ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र शस्त्रप्रणाली खरेदी करण्यासाठी लष्कराने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (बीईएल) अंदाजे 30,000 कोटींची निविदा जारी केली आहे. ही यंत्रणा संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने (डीआरडीओ) विकसित केली आहे. पूर्वी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र म्हणून ओळखली जाणारी क्विक रिअॅक्शन ही यंत्रणा बदलून आता ‘अनंत शस्त्र’ असे ठेवण्यात आले आहे. ‘अनंत शस्त्र’च्या पाच ते सहा रेजिमेंट खरेदी केल्यानंतर त्या पाकिस्तान-चीन सीमेवर तैनात केल्या जातील.
‘अनंत शस्त्र’चे वैशिष्ट्या म्हणजे ते चौफेर फिरत असतानाही शत्रूच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. ते अगदी कमी वेळात गोळीबार देखील करू शकते. त्याची रेंज अंदाजे जमिनीपासून हवेत 4 किलोमीटर इतकी आहे. ते लष्कराच्या विद्यमान आकाश तीर आणि मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागापासून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींना पूरक ठरेल. ‘अनंत शस्त्र’ची दिवसा आणि रात्री यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर नंतर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.
भारताच्या वतीने मिशन ‘सुदर्शन चक्र’ मोहीम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी याची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत, भारतीय लष्कराने सरकारी मालकीच्या कंपनी अॅडव्हान्स्ड वेपन अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेडकडून सहा एके-630 हवाई संरक्षण तोफा प्रणाली खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे. हे पाऊल भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते. ही प्रणाली 30 मिमी मल्टी-बॅरल मोबाईल एअर डिफेन्स गन असून त्याचा फायरिंग स्पीड प्रचंड आहे. शत्रूचा कोणताही ड्रोन, रॉकेट किंवा मोर्टार सीमेवर पोहोचण्यापूर्वीच नष्ट करण्याची क्षमता त्यात आहे. ही गन सिस्टीम ट्रेलरवर बसवल्यानंतर हाय-मोबिलिटी व्हेईकलद्वारे ओढली जाईल. यात ऑल-वेदर इलेक्ट्रो-ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टम असल्यामुळे कोणत्याही हवामानात लक्ष्यांना अचूकपणे टिपू शकते.
भारताचे आत्मनिर्भर सुरक्षा कवच
पाकिस्तानने मे महिन्यात जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील सीमावर्ती भागात थेट हल्ले केले. त्यावेळी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे अनेक हल्ले हाणून पाडले. त्यानंतर, ‘मिशन सुदर्शन चक्र’च्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मिशन सुदर्शन चक्र’ला भारताचे स्वदेशी ‘आयर्न डोम’ म्हटले जात आहे. इस्रायलचे अनुकरण करून भारत 2035 पर्यंत एक बहुस्तरीय सुरक्षा कवच विकसित करत असून ते हवाई संरक्षण, देखरेख आणि सायबर सुरक्षा एकाच व्यासपीठावर एकत्रित करेल. हे अभियान केवळ बचावात्मक नाही तर त्यात आक्रमक शक्तीही असणार आहे. ही प्रणाली केवळ शत्रूच्या हालचालींना रोखू शकत नाही तर प्रतिहल्ला करण्यास देखील सक्षम आहे.