For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वदेशी ‘एआय’, विदेशीला ‘बाय बाय’

06:47 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वदेशी ‘एआय’  विदेशीला ‘बाय बाय’
Advertisement

 नवी दिल्ली येथे 19 आणि 20 फेब्रुवारीला एक जागतिक ‘एआय’ परिषद आयोजित केली जात आहे, जिथे भारत आपले ’स्वदेशी एआय तंत्रज्ञान‘ जगासमोर मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत एक गोलमेज बैठक आयोजित केली होती. भारतात होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ च्या पार्श्वभूमीवर या शिखर परिषदेमधील ‘एआय फॉर ऑल : ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’साठी पात्र ठरलेले 12 भारतीय एआय स्टार्टअप्स या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आपल्या कल्पना आणि कार्याचे सादरीकरण केले.

Advertisement

सध्याचे युग ‘एआय युग’ म्हणून ओळखले जाते. सर्वच क्षेत्रात आज झपाट्याने बदल घडतोय. या बदलाचा परिणाम दूरवर होणार आहे. त्यादृष्टीने भारताने पावले उचलली आहेत. भविष्यातील बदलांचा वेध घेत आतापासूनच स्वदेशी ‘एआय’ अॅप्स, मॉडेल्स विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

भारतीय भाषांची फाऊंडेशन मॉडेल्स, बहुभाषिक एलएलएम, स्पीच-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-ऑडिओ आणि टेक्स्ट-टू-व्हिडिओ, ई-कॉमर्स, मार्केटिंग आणि वैयक्तिक आशय निर्मितीसाठी जनरेटिव्ह एआय 3-डी आशय तयार करणे, अभियांत्रिकी सिम्युलेशन, साहित्य संशोधन आणि विविध उद्योगांमध्ये डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेसाठी प्रगत विश्लेषण, आरोग्य सेवा निदान आणि वैद्यकीय संशोधन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हे स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

Advertisement

या ‘एआय’ स्टार्टअप्सनी देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला प्रगत करण्याच्या भारताच्या खंबीर पावलांचे कौतुक केले. त्यांनी ‘एआय’ क्षेत्राची झपाट्याने होणारी वाढ आणि भविष्यातील प्रचंड संधी याचा उहापोह केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवोन्मेष आणि उपयोगाचा केंद्रबिंदू भारताकडे सरकू लागल्याचे निरीक्षण नोंदविले. भारत आता ‘एआय’ विकासासाठी एक भक्कम आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देत असल्यामुळे जागतिक एआय नकाशावर देशाचे स्थान भक्कम झाले आहे, अशी भावना या उद्योजकांनी व्यक्त केली.

समाजात परिवर्तन घडवून आणण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व आहे. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या माध्यमातून देश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यादृष्टीने या बैठकीला अवतार, भारतजेन, फ्रॅक्टल, गॅन, जेन लूप, ज्ञानी, इंटेलिहेल्थ, सर्वम, शोध एआय, सोकेट एआय, टेक महिंद्रा आणि झेंटेक यासह भारतीय एआय स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत तिसऱ्या क्रमांकावर

भारताने गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून आज भारत जगातील अव्वल तीन एआय महासत्तांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2025-26 च्या ‘एआय व्हायब्रन्सी इंडेक्स’नुसार, अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  विश्वासार्ह भागीदाराचा शोध

अलिकडे अमेरिकेने भारताविऊद्ध लागू केलेल्या दंडात्मक शुल्क उपाययोजनांमुळे आता भारताला विश्वासार्ह भागीदार शोधावे लागणार आहेत. त्या दृष्टीने दिल्लीत होणारी ‘एआय समिट’ महत्वपूर्ण ठरणार आहे. ‘एआय व्हॅल्यू चेन’मधील महत्वाचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न आहेत. आगामी ‘इंडिया एआय समिट’मुळे जागतिक सहकार्याचा अजेंडा ठरणार आहे.

    डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रणाली

युरोपातील इतर अनेक देशांकडे उच्च-कार्यक्षमता संगणकीय पायाभूत सुविधा आहेत, ज्यांचा उपयोग अत्याधुनिक शैक्षणिक संशोधनासाठी केला जातो. जपान आणि दक्षिण कोरियाकडे मजबूत संशोधन व विकास आणि हार्डवेअर इको-सिस्टीमचा आधार आहे. याशिवाय भारत, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसारख्या देशांनी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रणाली विकसित केल्या आहेत, ज्यामुळे एआय प्रशिक्षणासाठी समृद्ध डेटा उपलब्ध होत आहे.

सरकारी उपक्रम आणि ‘इंडिया एआय मिशन’

भारत सरकारने एआय क्षेत्राला चालना देण्यासाठी 10,300 कोटी ऊपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. संशोधक आणि स्टार्टअप्सना स्वस्त दरात ‘कॉम्प्युटिंग पॉवर’ उपलब्ध करून देण्यासाठी 38 हजारहून अधिक ‘जीपीयू’ स्थापित करण्यात आले आहेत.

 एआय उत्कृष्टता केंद्रे

कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरे यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांसाठी विशेष केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी  एआय आधारित ‘भाषिणी’ प्लॅटफॉर्म विकसित केले गेले आहे. भारतात सध्या 5,000 पेक्षा जास्त एआय स्टार्टअप्स कार्यरत आहेत. 2024-25 मध्ये सुरू झालेल्या नवीन स्टार्टअप्सपैकी तब्बल 89 टक्के स्टार्टअप्सनी त्यांच्या उत्पादनांमध्ये एआयचा वापर केला आहे.

पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक 

गुगलसारख्या बड्या कंपन्यांनी भारतात एआय पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक (उदा. आंध्र प्रदेशातील 15 अब्ज डॉलर्सचा एआय हब) केली आहे. ‘भारतजन’ आणि ‘सर्वम एआय’सारखे प्रकल्प भारताचे स्वत:चे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ विकसित करत आहेत.

युवा एआय फॉर ऑल

एका सर्वेक्षणानुसार भारतात 62 टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी जनरेटिव्ह एआयचा वापर करतात, जे जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. सरकारने 10 लाख तऊणांना ‘एआय’मध्ये प्रशिक्षित करण्याची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. ‘युवा एआय फॉर ऑल’सारखे विनामूल्य कोर्सेस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेत भर

एका अंदाजानुसार 2035 पर्यंत ‘एआय’ भारताच्या अर्थव्यवस्थेत 1.7 ट्रिलियन डॉलर्सची भर घालू शकते. भारताचे धोरण केवळ तंत्रज्ञान विकसित करण्यापुरते मर्यादित नसून, ते सर्वांसाठी ‘एआय’ या तत्वावर आधारित आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि ऊग्ण यांनाही याचा लाभ मिळावा.

शिक्षण क्षेत्रात प्रभावी वापर

भारताने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी ‘एआय’चा प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘दीक्षा’ सारख्या सरकारी प्लॅटफॉर्मवर आता ‘एआय’ ट्यूटर्स उपलब्ध आहेत. हे ट्यूटर्स विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार त्याला प्रश्न विचारतात आणि शंकांचे निरसन करतात. भारताच्या ‘भाषिणी’ अॅपमुळे आता इंग्रजीतील उच्च दर्जाचे कोर्सेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध होत आहेत. शिक्षकांवरील ओझे कमी करण्यासाठी उत्तरपत्रिका तपासणे आणि उपस्थिती नोंदविणे यांसारख्या कामांसाठी एआयचा वापर केला जात आहे.

आरोग्य क्षेत्रातही वापर

आरोग्य क्षेत्रात ‘एआय’ जीवनरक्षक ठरत आहे, विशेषत: अशा भागात जिथे तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. ‘एआय’ आधारित सॉफ्टवेअर आता मानवी डोळ्यांपेक्षाही अचूकपणे क्षयरोग, कर्करोग आणि डोळ्यांचे आजार स्कॅन किंवा एक्स-रेद्वारे ओळखू शकतात. ‘आयुष्मान भारत’सारख्या सरकारी योजनेंतर्गत ऊग्णांचा डेटा विश्लेषित करून कोणत्या भागात कोणत्या आजाराचा धोका जास्त आहे, याचे भाकीत ‘एआय’द्वारे केले जात आहे. ग्रामीण भागातील ऊग्ण ‘एआय चॅटबॉट्स’द्वारे प्राथमिक सल्ला घेऊ शकतात, ज्यामुळे डॉक्टरांवरील ताण कमी होतो.

  शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र

भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ आता एक ‘डिजिटल मित्र’ म्हणून समोर येत आहे. ‘एआय’ आणि ड्रोन्सचा वापर करून पिकांवरील कीड ओळखणे आणि फक्त गरजेच्या ठिकाणीच कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. ‘अॅग्रीस्टॅक’ या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार कोणते पीक घ्यावे आणि हवामान कसे असेल, याची अचूक माहिती मोबाईलवर दिली जाते. अल्गोरिदम भविष्यातील बाजारभावाचा अंदाज वर्तवतात, ज्यामुळे शेतकरी त्यांचे पीक कधी विकायचे, याचा योग्य निर्णय घेऊ शकतात.

अमेरिका, चीनचे नियंत्रण

प्रगत संगणनाच्या व्हॅल्यू चेनच्या उच्च टप्प्यावर अमेरिकेचे नियंत्रण आहे. हा देश निर्यात नियंत्रणाद्वारे जागतिक पुरवठा नियंत्रित करते. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी आवश्यक असलेली महत्वाची खनिजे चीनमध्ये केंद्रीत आहेत. या दोन्ही देशांनी जगभर वापरली जाणारी यशस्वी एआय मॉडेल्स विकसित केली आहेत. यामध्ये अमेरिकेच्या चॅट-जीपीटी तर चीनच्या डीपी-सीक यांचा समावेश आहे. या साधनांमुळे अमेरिका आणि चीनला जागतिक बाजारपेठेत जलदगतीने प्रवेश मिळतो. एआयच्या शर्यतीत कोणाकडे साधने आहेत आणि कोणाकडे नाहीत, हे ते ठरवू शकतात. तसेच इतर देशांमधील स्थानिक नवकल्पना रोखू किंवा मर्यादित करू शकतात.

भारतीय स्टार्टअप्सनी जगाचे नेतृत्व करावे!

जगाचा भारतावर असलेला विश्वास हे देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स नैतिक, पक्षपातरहीत, पारदर्शक आणि डेटा गोपनीयतेच्या तत्वांवर आधारित असावीत. भारतातील स्टार्टअप्सनी जागतिक नेतृत्व म्हणून कार्य करावे. तसेच भारत परवडणारी कृत्रिम बुद्धिमत्ता, सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आणि जागतिक स्तरावर किफायतशीर नवोन्मेष बहाल करू शकतो. भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स इतरांपेक्षा वेगळी असावीत आणि त्यातून स्थानिक आणि स्वदेशी आशय तसेच स्थानिक भाषांना प्रोत्साहन मिळावे.

                      - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

                              संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी

Advertisement
Tags :

.