मारुती सुझुकीच्या कार्स महाग होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लवकरच आपल्या कार्सच्या किमती वाढवणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला कार्सच्या किमती वाढवणे अपरिहार्य असल्याचे बोलले जात आहे.
कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले की, जीएसटी दरातील कपातीनंतर बाजारात वाहनांची मागणी मजबूत राहिली होती. कंपनीकडे सध्याला 1.75 लाख वाहनांची प्रलंबीत मागणी आहे, ती पूर्ण करण्यात येत आहे. जानेवारीत कंपनीकडे 2.78 लाख वाहनांचे बुकिंग प्राप्त झाले होते. अलीकडच्या काळात कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असून त्याचा परिणाम कार उत्पादन खर्चावर पडत आहे. विशेषत: धातुच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने येत्या काळात कार किमती वाढवण्याचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. सर्व गोष्टींचा पडताळा केल्यानंतरच कार्सच्या किमती वाढवण्याबाबतचा निर्णय अंतिम केला जाईल. ग्राहकांवर किमत वाढीचा बोजा कमीत कमी राहिल याची काळजी घेतली जात आहे. पुरवठा साखळी संघ व उत्पादन संघ यांच्यासोबत आपण चर्चा कऊ.
जानेवारीत 2 लाख वाहन विक्री
याचदरम्यान मारुती सुझुकीने जानेवारीत विक्रमी कार विक्री केली असल्याचे समजते. कंपनीने सदरच्या महिन्यात 2 लाख 36 हजार 963 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीला 2.78 वाहनांचे बुकिंगही प्राप्त झाले आहे. बाजारात 9 हजार ते 10 हजार जण दररोज मारुतीच्या कार्स खरेदीसाठी बुक करत आहेत. कंपनीने याचदरम्यान 51,020 वाहनांची निर्यात केली आहे. हा निर्यातीचा आकडाही आतापर्यंत सर्वाधिक मासिक निर्यातीचा आकडा म्हटला जात आहे. एसयुव्ही विक्टोरीसला चांगला प्रतिसाद मिळालाय.