मोहम्मद नबीकडून निवृत्तीचे संकेत
वृत्तसंस्था / शारजा
अफगाणचा अनुभवी आणि ज्येष्ट अष्टपैलु मोहम्मद नबीने वनडे क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. येथे नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणने मालिका विजय मिळविला. या मालिकेत फलंदाजीत 135 धावा आणि 2 गडी बाद करणाऱ्या नबीला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यानंतर नबीने पुढील वर्षी पाकमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्ती होणार असल्याचे संकेत दिले.
अफगाणच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये 39 वर्षीय मोहम्मद नबीने सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वनडे क्रिकेटमध्ये चढ-उतार आले असले तरी त्याने गेल्यावर्षी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे ठरविले आहे. पण आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेटसाठी अफगाणचा संघ पात्र ठरल्याने आपण निवृत्तीचा निर्णय बदलला आणि आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर आपण वनडे क्रिकेटला निरोप देणार असल्याचे सांगितले. मात्र टी-20 प्रकारात आपण आणखीन काही दिवस खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 2009 साली मोहम्मद नबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017 साली अफगाण संघाला आयसीसीकडून कसोटी दर्जा मिळाला. अफगाण संघाने डेन्मार्क, इटली, अर्जेटिना, टांझानिया या नवख्या संघांवर विजय मिळविला तर त्यानंतर या संघाने स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिरात, नामीबिया आणि नेदरलॅन्ड यांनाही पराभूत केले. अफगाण संघाचा दर्जा सुधारत गेला आणि अलिकडच्या कालावधीत कसोटी खेळणाऱ्या लंका, पाक, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि विंडीज संघावरही विजय मिळविले. मोहम्मद नबीने वनडे क्रिकेटमध्ये 167 सामन्यात 27.48 धावांच्या सरासरीने 3600 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत 32.47 धावांच्या सरासरीने 172 गडी बाद केले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियनशीप करंडक स्पर्धेत अफगाणचा पहिल्यांदाच सहभाग राहणार आहे.