For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

25 टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द करण्याचे संकेत

06:55 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
25 टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द करण्याचे संकेत
Advertisement

अमेरिकन अर्थमंत्र्यांचे सकारात्मक प्रतिपादन : भारताने रशियाकडील तेल खरेदी कमी केल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफपैकी निम्मे म्हणजेच 25 टक्के अतिरिक्त शुल्क मागे घेण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी याबाबत अमेरिकन मीडिया वेबसाइट पॉलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत सकारात्मक वक्तव्य केले. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी लक्षणीयरीत्या कमी केल्यामुळे टॅरिफ सवलतीला वाव निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. तसेच बेझंट यांनी अमेरिकेसाठी हा एक मोठा विजय असल्याचा दावा केला.

Advertisement

अमेरिकेने ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर दोन टॅरिफ लादले. सुरुवातीला 1 ऑगस्ट रोजी व्यापार तुटीमुळे 25 टक्के टॅरिफ होता. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्यात आला. एकंदर भारतावर 50 टक्के कर लादण्यात आलेला आहे. भारताने हा टॅरिफ कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी अंतिम व्यापार करार अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही. आता हा व्यापार करार पूर्णत्वास नेण्यासाठी दोन्ही देशांकडून अंतिम बोलणी सुरू असल्याचे समजते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच दावोसमधील गुंतवणूक परिषदेत भारतासोबतचा व्यापार करार दृष्टिपथात असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांची भलावणही केली होती. त्यानंतर आता अमेरिकन अर्थमंत्र्यांकडूनही टॅरिफ कमी करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. भारतावर लादलेला 25 टक्के टॅरिफ खूप प्रभावी ठरल्यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. हा टॅरिफ अजूनही सुरू असला तरी तो काढून टाकण्याचा मार्ग आता शोधला जाऊ शकतो, असे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी म्हटले आहे. व्यापार कराराबद्दल दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू असताना हे विधान आले आहे.

आकडेवारी पाहता, डिसेंबर 2025 मध्ये रशियाकडून तेल खरेदीच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर घसरला. तुर्की दुसऱ्या क्रमांकावर आणि चीन पहिल्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये भारताची रशियन तेल आयात जवळजवळ एक तृतीयांश घटली. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी कमी केलेली खरेदी यात सर्वात मोठे योगदान देणारी ठरली. याबाबत भारत सरकारची भूमिका संतुलित राहिली आहे. जर अमेरिकेने टॅरिफ सवलत दिली तर भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीला नवी चालना मिळू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. येत्या आठवड्यात दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या व्यापार चर्चा यासंदर्भात निर्णायक ठरू शकतात.

Advertisement
Tags :

.