मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे संकेत
काही मंत्र्यांना त्याग करण्याचा संदेश : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहेत. ग्राम पंचायतींच्या अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षे करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही मंत्र्यांनाही संदेश दिला आहे. सध्या याविषयी अधिक चर्चा नको, असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी बेंगळूरमधील काँग्रेस कार्यालयात आयोजित संविधानदिन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वत:हून कोणीही आपल्या पदाचा त्याग करत नाही. आम्ही काही मंत्र्यांना संदेश पाठविला आहे. दोन वर्षांच्या आत अधिकाराचा त्याग करावा, अशी सूचना दिली आहे, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे स्पष्ट संकेत दिले.
गाम पंचायत अध्यक्षांना एक वर्षानंतर राजीनामा देताना मनावर बराच ताण येतो. आता त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा करण्यात आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाची संधी असूनदेखील पदाचा त्याग केला. आता मंत्र्यांना त्याग करण्यास सांगितले आहे, असे ते मार्मिकपणे म्हणाले.
महर्षि वाल्मिकी विकास निगममधील अनुदानाच्या दुरुपयोग प्रकरणात बी. नागेंद्र यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळील खात्याचा भार मुख्यमंत्र्यांवर पडला आहे. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातच नाराजी आहे. अनेक ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनाही संधी देण्याच्या उद्देशाने काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात येत्या दिवसांत नवे चेहरे दिसून आले तर नवल नाही