For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची ‘युवा’ सेना पराभूत

06:58 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची ‘युवा’ सेना पराभूत
Advertisement

टीम इंडिया 102 धावांवर ऑलआऊट : पहिल्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वे 13 धावांनी विजयी :

Advertisement

वृत्तसंस्था/ हरारे

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात यजमान झिम्बाब्वेने भारताला 13 धावांनी पराभूत करण्याची किमया केली. झिम्बाब्वेच्या नवख्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेला 20 षटकात 9 बाद 115 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 19.5 षटकात 102 धावांवर ऑलआऊट झाला. उभय संघातील दुसरा टी 20 सामना हरारे येथे आज खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरु होईल. दरम्यान, 17 धावा व 3 बळी घेणाऱ्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात झिम्बाब्वेचा भारतावर तिसरा विजय आहे. हे तीनही विजय त्यांनी हरारे याठिकाणी नोंदवले आहेत.

Advertisement

भारतीय फलंदाज फ्लॉप

झिम्बाब्वेच्या 116 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या संघाला पहिल्या षटकात धक्का बसला. चौथ्याच चेंडूवर भारतासाठी पदार्पण करणारा अभिषेक शर्मा झेलबाद झाला. अभिषेकला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाडलाही जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ऋतुराज सात धावांवर बाद झाला. यानंतर चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या रियान परागकडून  मोठ्या अपेक्षा होत्या. पण परागही सपशेल अपयशी ठरला. ही सर्व पडझड होत असताना भारताचा हुकमी एक्का असलेला रिंकू सिंग फलंदाजीला आला. रिंकू सामना फिरवेल, अशी चाहत्यांना आशा होता. पण रिंकूला देखील भोपळा फोडता आला नाही. यावेळी भ्भारताची 4 बाद 22 अशी अवस्था झाली होती.

कर्णधार शुभमन गिलने सावधपणे फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवत होता. पण, मोठा फटका मारण्याचा मोह गिलला आवरला नाही. 31 धावांवर सिकंदर रजाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने शेवटपर्यंत प्रयत्न केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सुंदरने 34 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. सुंदर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव 102 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून तेंदाई चटारा व सिकंदर रजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर युवा टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार गिलचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्या षटकात झिम्बाब्वेने सावध सुरुवात केली. खलील अहमदच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा काढल्या. मात्र दुसऱ्या षटकापासून झिम्बाब्वेच्या फलंदाजीला ग्रहण लागले. मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर कैयाचा त्रिफळा उडवला. यानंतर वेस्ली मेडवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 34 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात रवि बिष्णोईला यश आले. बेनेट 22 धावा करत तंबूत परतला. पाठोपाठ वेस्लीही 21 धावा काढून बाद झाला.

रवि बिष्णोईची शानदार गोलंदाजी

अडचणीत सापडलेल्या झिम्बाब्वेला एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असताना कर्णधार सिंकदर रझाने डिऑन मायर्ससोबत प्रयत्न केला. मात्र ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. सिकंदर रझा 17 धावा करून बाद झाला. मेयर्सला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मेयर्सने 23 धावांचे योगदान दिले. यानंतर आलेल्या जोनाथन कॅम्पबेलला खातंही खोलता आलं नाही. धावचीत होत तो तंबूत परतला. क्लाईव्ह मदनाडेने मात्र संयमी खेळी करत संघाचे शतक फलकावर लावले. क्लाईव्हने 4 चौकारासह नाबाद 29 धावा केल्या पण त्याला तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. भारताकडून रवि बिष्णोईने 13 धावा देत 4 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 तर मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे 20 षटकांत 9 बाद 115 (वेस्ली मेडवेरे 21, ब्रायन बेनेट 22, सिकंदर रजा 17, डिऑन मेयर्स 23, क्लाईव्ह मदनाडे नाबाद 29, रवि बिष्णोई 13 धावांत 4 बळी, वॉशिंग्टन सुंदर 11 धावांत 2 बळी, मुकेश कुमार व आवेश खान प्रत्येकी एक बळी).

भारत 19.5 षटकांत सर्वबाद 102 (शुभमन गिल 31, ऋतुराज गायकवाड 7, ध्रुव जुरेल 6, वॉशिंग्टन सुंदर 27, आवेश खान 16, तेंदाई चटारा व सिकंदर रजा प्रत्येकी तीन बळी).

अभिषेक शर्मा, रियान पराग व ध्रुव जुरेलचे टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण

झिम्बाब्वे पहिल्या टी 20 सामन्यात अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अभिषेक आणि रियान पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत, तर जुरेलने यापूर्वीच कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, पदार्पण संस्मरणीय बनवण्यासाठी या तिन्ही खेळाडूंच्या नजरा असतील. शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन तिसऱ्या सामन्यातून पुन्हा संघात सामील होऊ शकतात, त्यानंतर टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कॉम्बिनेशन बदलले जाऊ शकते. अशा स्थितीत अभिषेक, ध्रुव आणि रियान पराग यांना पहिल्या 2 सामन्यात दमदार कामगिरी करून भारतीय संघात आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचावा लागेल.

Advertisement
Tags :

.