भारताचा अफगाणवर पठाणी व्याजासहित विजय!
कुठल्याही गोष्टीची सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. काल नेमकं भारताच्या बाबतीत तेच घडलं. गंमत बघा, अफगाणिस्तान संघ आता टी-20 मध्ये लिंबू टिंबू पठडीतला राहिलेला नाही. किंबहुना प्रतिस्पर्धी संघाविऊद्धचा विजय हा मुद्दल अधिक व्याज, नव्हे ते तर पठाणी व्याजासहित वसूल करायचा हा त्यांचा नेहमीच मानस राहिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आलंय. अर्थात अफगाणिस्तानला भारतीय संघाने सुऊवातीपासूनच कमी लेखले नाही हेही तेवढंच खरं.
नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारल्यानंतर विराट व रोहित सलामीला आल्यानंतर थोडंसं आश्चर्यच वाटलं. मी काल परवाच्या लेखात म्हटलं होतं की आता प्रयोग नकोत. अर्थात विराटने 24 चेंडूत 24 धावा काढल्या खऱ्या, परंतु या धावा म्हणजे भरलेल्या पंचपक्वान्नाच्या ताटात लोणच्याची एक फोडच म्हणा. दुसरीकडे मात्र आपले ‘पंत’ एवढ्या लवकर वेडेवाकडे फटके का मारत होते हे मात्र समजू शकले नाही. ऋषभ पंतला फलंदाजी करताना ज्या ज्या वेळी बघितले जाते त्या त्यावेळी वीरेंद्र सेहवागची आठवण येते. दोघेही नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध किंबहुना त्याच खेळावर त्यांचा जास्त विश्वास. असो. आज पुन्हा एकदा आकाशात संकटाचे काळे ढग जमा झाले होते. अर्थात त्याला कारणीभूत होता अफगाणचा रशिद खान. हाच रशिद खान आजकाल भल्या भल्यांचे कंबरडे मोडतोय. काल तर त्याच्या गळाला ऋषभ पंत, विराट कोहली आणि शिवम दुबे यांच्यासारखे मोठे मासे लागले होते. परंतु ज्या फलंदाजाला फलंदाजी करताना आकाशही ठेंगणे वाटू लागते अशा सूर्यकुमार यादवने हे ढग कुठच्या कुठे पळवले. आज पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव श्रीकृष्णसारखा धावत आला. आपण टी-20 स्पेशालिस्ट का आहोत हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.
182 धावांचा पाठलाग करताना मात्र अफगाणिस्तान संघाच्या सलामीवीरांनी पहिल्याच षटकात आपले इरादे स्पष्ट केले होते. अनुभवी गोलंदाजासमोर कसे खेळावे विशेषत: बुमराहसारख्या गोलंदाजासमोर हे अफगाणिस्तानच्या सलामीवीरांना कळलंच नाही. आणि बघता बघता बुमराहने यॉर्करशिवाय आपल्याकडे इतरही अस्त्रं आहेत हे काल त्याने दाखवून दिले. खरंच गोलंदाजीत प्रत्येक वेळी बुमराह धावून आलाय. ज्या ज्या वेळी संकट आले त्या त्यावेळी बुमराहच्या हाती चेंडू दिला जातो आणि नियतीही त्याला तथास्तु म्हणते. असं एकंदरीत भारताने अफगाणिस्तानला धोबीपछाड देत उपांत्य फेरीचा दरवाजा स्वत: उघडा केलाय. या दरवाजावर उपांत्य फेरीचे तोरण भारतीय संघ कधी बांधणार, याची औपचारिकता शिल्लक आहे. या विजयासहित काही गोष्टी मात्र अनुत्तरीत राहिल्यात. सुऊवातीचे फलंदाज आपल्याला निराश करतायेत. या बाबीकडे मात्र रोहित सेनाने कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे एवढं मात्र खरं. एकंदरीत या सामन्याचा विचार केला तर पठाणी व्याजासहित हा विजय मिळवला आहे, हे सत्य मात्र नाकारून चालणार नाही. जिथे अफगाणिस्तान संघाचे वाघ डरकाळी फोडू पाहत होते, तिथे मात्र त्यांच्या संघाची मनिम्याऊ झाली एवढं मात्र खरं.!