भारताच्या 12 वर्षांखालील फुटबॉल संघाने रचला इतिहास
रिअल माद्रिद फाऊंडेशन वर्ल्ड चॅलेंज’मध्ये मिळविले विजेतेपद
वृत्तसंस्था / माद्रिद, स्पेन :
स्पेनमधील माद्रिद येथे असलेल्या रिअल माद्रिदच्या प्रतिष्ठित प्रशिक्षण संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘रिअल माद्रिद फाउंडेशन वर्ल्ड चॅलेंज’ या मानाच्या स्पर्धेत भारताचा 12 वर्षांखालील फुटबॉल संघ विजेता ठरला आहे. जगभरातील काही सर्वोत्तम संघांशी स्पर्धा करत भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अत्यंत संयमी आणि वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन घडविले.
रणनीतिक शिस्त आणि आक्रमक खेळाचा सुरेख मेळ साधलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत ब्राझीलचा सामना करताना 3-0 अशा निर्णायक फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. एका आघाडीच्या युरोपियन क्लबद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा भव्य विस्तार आणि उच्च दर्जा पाहता ही कामगिरी अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. ही कामगिरी भारतातील तळागाळातील फुटबॉल व्यवस्थेची होत असलेली सातत्यपूर्ण प्रगती दर्शवते तसेच देशातील युवा खेळाडूंच्या विकासासाठी एक नवीन आदर्श प्रस्थापित करते.
ईस्टर सप्ताहादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या या वार्षिक स्पर्धेत 10 वर्षांखालील, 12 वर्षांखालील आणि 14 वर्षांखालील या वयोगटांत 80 हून अधिक संघ आणि 1,000 हून अधिक किशोरवयीन खेळाडू सहभागी झाले होते. भारताचा 14 वर्षांखालील संघही उपांत्य फेरीत पोहोचला होता, मात्र इटलीविऊद्धच्या अत्यंत चुरशीच्या आणि पाच गोलांचा थरार अनुभवलेल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्याच्या दुसऱ्या सत्राच्या अखेरीस इटलीने निर्णायक गोल नोंदवला. दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, बेंगळूर आणि हैदराबाद येथील खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघांनी ‘कॉन्शियंट स्पोर्ट्स’ कार्यक्रमाचा भाग या नात्याने प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या सर्वोच्च स्थानापर्यंतच्या प्रवासात स्पेन, जर्मनी, ब्राझील, उऊग्वे, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, अझरबैजान आणि मोरोक्को या संघांविऊद्धच्या उल्लेखनीय विजयांचा समावेश होता.
भारताच्या किशोरवयीन मुलांचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश
-भारताच्या यू-14 फुटबॉल संघाचीही उपांत्य फेरीपर्यंत धडक
-स्पर्धेत अनेक नामवंत संघांचा सहभाग