For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा विश्वासू मित्र : सेशेल्स

06:55 AM Jul 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंद महासागर क्षेत्रातील भारताचा विश्वासू मित्र   सेशेल्स
Advertisement

मॉरिशसप्रमाणेच हिंद महासागर क्षेत्रात सेशेल्स या द्वीप-राष्ट्राचे स्वतंत्र भूराजनैतिक स्थान आहे. हिंदी महासागराच्या पश्चिम भागात वसलेला हा द्वीपसमूह केनियाच्या पूर्वेस सुमारे 1,600 किलोमीटर अंतरावर असून भौगोलिकदृष्ट्या आफ्रिका खंडाचा भाग मानला जातो. त्याच्या नैऋत्येस मादागास्कर हे बेट आहे. आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्व यांना जोडणाऱ्या सागरी मार्गांच्या संगमावर वसल्यामुळे सेशेल्सला विशेष सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

शे शेल्स हे सार्वभौम प्रजासत्ताक असून 1976 मध्ये त्याला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतींत तो आफ्रिकेतील सर्वांत लहान देशांपैकी एक आहे. व्हिक्टोरिया ही त्याची राजधानी असून ती माहे (श्aप्) या मुख्य बेटावर वसलेली आहे. आफ्रिकन युनियन, दक्षिण आफ्रिका विकास समुदाय (एAअ) आणि राष्ट्रकुलाचा तो सक्रिय सदस्य आहे. हिंद महासागरातील मध्यवर्ती स्थानामुळे सागरी सुरक्षा, नील अर्थव्यवस्था (ँत्ल म्दिंहदस्ब्) आणि हिंद-प्रशांत प्रदेशातील सामरिक संतुलनाच्या दृष्टीने सेशेल्स अत्यंत महत्त्वाचा देश ठरतो. अवघे 452 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असूनही त्याचे भूराजनैतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 भेटीचे प्रयोजन व फलश्रुती

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सला तीन दिवसांची अधिकृत भेट दिली. या भेटीदरम्यान 19 महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताची यूपीआय प्रणाली स्वीकारणे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सागरी सुरक्षा, आरोग्य, हवामान कृती आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित विशेष समारंभात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या भेटीमुळे दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक आणि सामरिक संबंधांना नवी दिशा मिळाली.

 सागरी सुरक्षा आणि पर्यावरण

हिंद महासागराच्या पश्चिम भागातील महत्त्वाचा द्वीपसमूह म्हणून सेशेल्सबरोबर संरक्षण आणि सागरी सुरक्षेचे संबंध अधिक बळकट करणे हा भारताच्या या द्रौऱ्याचा प्रमुख उद्देश होता. या दृष्टीने दोन्ही देशांनी अनेक महत्त्वपूर्ण करार केले.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि दहशतवादाविरुद्ध प्रभावी सहकार्य करण्यासाठी प्रत्यार्पण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताने सेशेल्सला सागरी सुरक्षा उपकरणे, तटरक्षक दलासाठी आवश्यक साधने तसेच सहा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दोन्ही देशांतील विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ झाले आहे. आरोग्य क्षेत्रातही भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमार्फत प्रधानमंत्री जनऔषधी योजनेअंतर्गत परवडणारी जनरिक औषधे आणि वैद्यकीय साहित्य सेशेल्सला उपलब्ध करून देण्याचा करार करण्यात आला. कोविडनंतर आरोग्य क्षेत्रातील हे सहकार्य अधिक स्थिर आणि व्यापक झाले आहे.

 आर्थिक सहकार्य व व्यापार

भारताने सेशेल्सच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष आर्थिक साहाय्य जाहीर केले आहे. विविध पतपुरवठा योजना, अनुदान आणि ‘लाईन ऑफ क्रेडिट’ च्या माध्यमातून सुमारे 1,250 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली. व्यापार, पर्यटन आणि लोकसंपर्क वाढविण्यासाठीही दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळून परस्पर समृद्धीचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे.

 विज्ञान-तंत्रज्ञान सहकार्य

अंतराळ संशोधन आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. या अनुभवाचा लाभ सेशेल्सला मिळावा यासाठी दोन्ही देशांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

शांततापूर्ण अवकाश संशोधन, हवामान बदलाचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि क्षमता विकास यासाठी विशेष करार करण्यात आले आहेत. या सहकार्यामुळे हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सेशेल्स अधिक सक्षम होईल.

 भूराजनैतिक संधी

या भेटीमुळे भारत आणि सेशेल्समधील राजकीय विश्वास अधिक दृढ झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि क्षमता विकासामुळे सेशेल्सच्या सामरिक क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. या दौऱ्यात सेशेल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ब्ल्यू होरायझन’ प्रदान केला. हवामान कृती, नील अर्थव्यवस्था आणि जागतिक सहकार्याला दिलेल्या योगदानाची ही दखल होती. याचबरोबर पंतप्रधान मोदी हे सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यांनी मुक्त, सुरक्षित आणि सर्वसमावेशक हिंद महासागराची संकल्पना मांडत भारताच्या ‘महासागर’ दृष्टिकोनाचा प्रभावी पुरस्कार केला.

समारोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेशेल्स दौरा भारत-सेशेल्स संबंधांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या भेटीमुळे संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. 19 सामंजस्य करार, विशेष आर्थिक सहाय्य आणि परस्पर विश्वासाच्या बळावर उभय देशांचे संबंध अधिक व्यापक आणि परिणामकारक बनले आहेत. हिंद महासागरातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारताचा ‘महासागर’ दृष्टिकोन आणि सेशेल्सचे सामरिक स्थान यांचा समन्वय भविष्यात संपूर्ण हिंद-प्रशांत प्रदेशातील सुरक्षा, विकास आणि सहकार्याला नवी गती देईल. त्यामुळे हा दौरा भारताच्या सागरी सामर्थ्याला बळकटी देणारा आणि हिंद महासागरातील सामरिक संतुलन अधिक दृढ करणारा ऐतिहासिक टप्पा म्हणून निश्चितच स्मरणात राहील.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.