भारताचे ‘टायगर मॅन’ वाल्मिक थापर यांचे निधन
वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात प्रसिद्ध वन्यजीव संवर्धनकर्ते आणि मान्यवर लेखकांपैकी एक वाल्मिक थापर यांचे शनिवारी सकाळी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. 1952 मध्ये नवी दिल्ली येथे जन्मलेल्या थापर यांनी आपले जीवन वाघांच्या अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्यांची ओळख ‘टायगर मॅन’ अशी निर्माण झाली होती. आपल्या कार्यासाठी त्यांनी 1988 मध्ये ‘रणथंभोर फाउंडेशन’ची सह-स्थापना करत समुदाय-आधारित संवर्धन प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणारी एक स्वयंसेवी संस्था निर्माण केली होती. थापर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
वाल्मिक थापर यांनी दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून समाजशास्त्रात सुवर्णपदक मिळवले. थापर यांनी अभिनेता शशी कपूर यांची मुलगी आणि नाट्या कलाकार संजना कपूरशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आहे. भारतीय संवर्धन प्रयत्नांमधील एक प्रमुख व्यक्ती आणि मूळ ‘प्रोजेक्ट टायगर टीम’चे प्रमुख सदस्य फतेह सिंग राठोड हे वाल्मिक थापर यांचे मार्गदर्शक होते.
थापर यांनी त्यांच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत शिकारविरोधी कडक कायदे आणि वाघांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नांसाठी जोरदार प्रयत्न केले. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळासह 150 हून अधिक सरकारी समित्या आणि कार्यदलांचा ते भाग होते. 2005 मध्ये माजी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने सारिस्का व्याघ्र प्रकल्पातून वाघ गायब झाल्यानंतर व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या व्याघ्र कार्यदलाचे सदस्य म्हणून थापर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंत 30 पुस्तके लिहिलेली किंवा संपादन केलेली आहेत.