भारताचा शेवटच्या चेंडूवर थरारक विजय
सामनावीर कृणाल पांड्या : 25 धावांत 3 बळी
वृत्तसंस्था, हाँगकाँग
येथे सुरु असलेल्या 2026 च्या हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत भारताने शेवटच्या चेंडूवर बांगलादेशचा 5 गड्यांनी पराभव करीत या स्पर्धेतील मोहिमेचा शेवट केला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या डावाला दमदार सुरुवात झाली. पहिल्या षटकात त्यांच्या सलामीच्या जोडीने 24 धावा झोडपल्या. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कृणाल पांड्याने आपल्या दोन षटकांमध्ये बांगलादेशचे शबीर रेहमान, मृत्यूंजय चौधरी आणि मोहम्मद रिझवान या तीन फलंदाजांना बाद केले. दरम्यान बांगलादेशचा कर्णधार अबू हैदरने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 18 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकविल्याने बांगलादेशने 6 षटकात 116 धावा जमवित भारताला 117 धावांचे आव्हान दिले.
भारताच्या डावाला शशांक सिंग आणि राहुल त्रिपाठी या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करुन देताना 69 धावांची भागिदारी केली. त्रिपाठीने 12 चेंडूत 32 तर शशांक सिंगने 15 चेंडूत 50 धावा झोडपताना 7 षटकार आणि 1 चौकार नोंदविला. भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 23 धावांची गरज होती. भारतीय संघातील नितीश राणाने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. या स्पर्धेत भारताला बॉल डिव्हिजन उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून केवळ 3 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
