भारताच्या तीन मुख्य एफटीएंना अंतिम स्वरुप
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ओमान आणि न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार (एफटीए) वरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. यावेळी अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या प्रश्नावर ते म्हणाले की, अमेरिकन व्यापार पथक मंगळवारपासून भारतात आहे. त्यांच्यासोबत चर्चा सातत्याने सुरू आहे. आम्ही द्विपक्षीय व्यापार कराराकडे वाटचाल करत आहोत. दक्षिण अमेरिकन राष्ट्र चिलीसोबत व्यापार करारावरील वाटाघाटी लवकरच पूर्ण होतील असेही गोयल यांनी सूचित केले. ‘चिलीचे व्यापार मंत्री दोन दिवसांपूर्वी येथे आले होते. चिलीसोबत लवकरच मुक्त व्यापार करार होईल. त्याचप्रमाणे ओमानसोबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. न्यूझीलंडचे मंत्री (टॉड मॅकले) परवा भारतात येत आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये चौथीफेरी आणि या वर्षी 13-14 जानेवारी रोजी पाचवी फेरी सुधारित प्रस्तावांवर केंद्रित होती. विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘सक्षम अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर, मसुदा कॅबिनेट नोट स्वाक्षरी आणि औपचारिक मंजुरीसाठी संबंधित मंत्रालयांना पाठवण्यात आला. दोन्ही पक्ष आता अंतर्गत मंजुरी मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत.’ वाणिज्य विभागाच्या निवेदनानुसार, भारत आणि ओमानने नोव्हेंबर 2023 मध्ये व्यापक चर्चा सुरू केली. तीन फेऱ्यांच्या सखोल वाटाघाटींनंतर (नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024), दोन्ही पक्षांनी बाजार प्रवेश प्रस्तावांसह सर्व सीइपीए घटकांवर अंतिम करार केला आहे. मार्च 2024 मध्ये सादर केलेला मंत्रिमंडळ प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा वाटाघाटी झाल्या.