भारताची तिसरी टी-20 लढत आज
फलंदाजांसमोर सूर मिळविण्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी टी-20 लढत आज बुधवारी होणार आहे. यावेळी भारतीय फलंदाजी फळीला पुनरागमन केलेल्या यजमानांविरुद्ध आपला सूर परत मिळविण्यासाठी सुपरस्पोर्ट पार्कच्या फारशा परिचित नसलेल्या परिस्थितीत प्रयत्न करावे लागतील. 2009 पासून भारत या ठिकाणी फक्त एक टी-20 लढत खेळलेला आहे, जो 2018 मध्ये त्यांनी सहा गडी राखून गमावला होता आणि त्या संघात खेळलेला हार्दिक पंड्या हा फक्त एकच खेळाडू सध्याच्या संघात आहे.
येथील खेळपट्टी ही गकेबरहा येथील खेळपट्टीसारखीच जलद आणि चेंडू उसळणारी असेल. दुसऱ्या टी-20 मध्ये भारताच्या फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांविऊद्ध संघर्ष करावा लागून त्यांना 6 बाद 124 धावांवर रोखण्यात आले होते. सेंच्युरियनमध्ये तशीच वैशिष्ट्यो आहेत. भारतीय फलंदाजीची समस्या वरच्या फळीपासून, खास करून अभिषेक शर्मापासून सुरू होते. त्याची सातत्याने खराब कामगिरी हा आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. संघ व्यवस्थापनाने रचना बदलण्याचा विचार करण्यापूर्वी त्याने येथे चांगली कामगिरी करून दाखविण्याची नितांत गरज आहे.
आताही ते संजू सॅमसनच्या साथीला तिलक वर्माला पाठविण्याचे आणि रमणदीप सिंगला मधल्या फळीत आणण्याचा विचार करू शकतात. तथापि, कर्णधार सूर्यकुमार यादव, पंड्या आणि रिंकू सिंग हेही भारताच्या संघर्षाबद्दलच्या दोषापासून दूर राहू शकत नाहीत. सूर्यकुमार आणि रिंकू या दोघांनीही आपल्या पराक्रमाची केवळ क्षणिक झलक येथे दाखवलेली असून पंड्याने दुसऱ्या सामन्यात 39 धावा केल्या, पण त्यासाठी 45 चेंडू घेतले. या पॉवर हिटरला त्याचा पहिला चौकार फटकावण्यासाठी 28 चेंडू लागले आणि त्यानंतर 39 व्या ते 45 व्या चेंडूदरम्यान त्याला चौकार हाणता आला नाही.
त्यामुळे, भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी या तिन्ही फलंदाजांना फॉर्मात असलेल्या सॅमसनला साथ द्यावी लागेल किंवा केरळच्या खेळाडूचा दिवस खराब गेला, तर या तिन्ही फलंदाजांना अधिक मदत करावी लागेल. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्यासाठी दोन्ही सामने विरोधाभासी राहिले. अर्शदीपने डर्बन येथे 25 धावांत 1 बळी घेतला, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने 41 धावा देऊन 1 गडी बाद केला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकात 28 धावा फटकावल्या गेल्या. त्यात ट्रिस्टन स्टब्सने एका षटकात फटकावलेल्या चार चौकारांचा समावेश राहिला. कमी धावसंख्येचा सामना असल्याने हे खूप परिणामकारक ठरले.
त्यामुळे व्यवस्थापनाने यश दयाल किंवा वैशाख विजयकुमार यासारख्या इतर पर्यायांचा विचार न केल्यास ते येथे कामगिरीत सुधारणा करून दाखविण्यास उत्सुक असतील. तथापि, वऊण चक्रवर्ती, ज्याने मागील सामन्यात पहिल्यांदाच 5 बळी मिळविले आणि रवी बिश्नोई यांचे गेल्या दोन सामन्यांतील प्रयत्न उत्कृष्ट राहिलेले आहेत. या खेळपट्टीवरील अपेक्षित उसळी आणि वेग हे वरील भारतीय जोडीसाठीही उत्साहवर्धक घटक असतील.
फलंदाजीच्या दृष्टिकोनातून दक्षिण आफ्रिकेला देखील तशाच समस्येचा सामना करावा लागत आहे. कारण या मालिकेत कर्णधार एडन मार्करम, डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांना अद्याप चमक दाखविता आलेली नाही. दुसऱ्या लढतीत लक्ष्य ओलांडण्यासाठी त्यांना ट्रिस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांच्या कामगिरीची गरज भासली. दक्षिण आफ्रिका त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंकडून नक्कीच सुधारित कामगिरीची अपेक्षा बाळगेल.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलेन, लुथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स.
सामन्याची वेळ : रात्री 8.30 वा.