दक्षिण आफ्रिकेसमोर आज भारताची कसोटी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या मोठे फटके मारण्याऐवजी नांगर टाकून राहण्याच्या नव्या धोरणाची कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार संघासमोर लागेल. आज रविवारी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सुपर एट सामन्यात भारतीय संघातील त्रुटींचा फायदा उठविण्यास दक्षिण आफ्रिका संघ सज्ज असल्याचे दिसून येते.
या संघात कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, केशव महाराज आणि एडेन मार्करम यांचा समावेश असलेली एक जबरदस्त गोलंदाजी फळी आहे. गेल्या दोन महिन्यांत हे दोन्ही संघ एकमेकांशी खेळण्याची ही सहावी खेप आहे. गट टप्प्यात भारताची परीक्षा पाहिली गेली नाही. परंतु घरच्या संघाला हे चांगलेच ठाऊक आहे की, त्यांच्या फलंदाजीकडून बरेच काही अपेक्षित आहे.
सलामीवीर इशान किशन (दोन अर्धशतके आणि 202 चा स्ट्राईक रेट) वगळता आघाडीच्या इतर तीन फलंदाजांनी आतापर्यंत खरोखरच रंगत आणलेली नाही. अभिषेक शर्मा तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे आणि सूर्यकुमार आणि तिलक यांनी नांगर घालून उभे राहण्याची भूमिका बजावणे योग्य मानले आहे. भारताच्या डावाला आवश्यक ती शक्ती हार्दिक पंड्या (155 चा स्ट्राईक रेट) आणि शिवम दुबे (178 चा स्ट्राईक रेट) यांच्याकडून दिली जात आहे. अभिषेक सलग दोनदा ऑफस्पिनर्सना बळी पडल्याने कर्णधार मार्करम पॉवरप्लेमध्ये ऑफब्रेक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो का हे पाहणे रंजक असेल.
अभिषेकचा फॉर्म अजूनही चिंतेचा विषय असला, तरी पहिल्या टप्प्यात तिलकची फलंदाजीही समाधानकारक राहिलेली नाही. भारताचे पारडे भारी बनविणारी गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह आणि वऊण चक्रवर्ती टाकत असलेली 20 पैकी आठ षटके. पहिल्या फेरीत चारही संघांपैकी कोणीही त्यांचा नीट सामना करू शकलेले नाही. चार सामन्यांत नऊ बळी घेणाऱ्या चक्रवर्तीने 5.16 च्या आश्चर्यकारक इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे आणि बुमराहने त्याच्या तीन सामन्यांत प्रति षटक फक्त सहा धावा दिल्या आहेत.
पण फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीविरुद्ध संपूर्ण गोलंदाजी विभागाला चांगले प्रदर्शन करावे लागेल. यामध्ये क्विंटन डी कॉक, मार्करम, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकल्टन, डेव्हिड मिलर आणि मार्को जॅनसेनसारखे पहिले सात दिग्गज खेळाडू आहेत, बदलांचा विचार केला, तर भारताकडून अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला खेळवण्याची अपेक्षा आहे आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेल एका सामन्याच्या विश्रांतीनंतर परत येईल. दक्षिण आफ्रिकेचा विचार करता यूएईविऊद्ध विश्रांती घेतलेले जॅनसेन, एनगिडी आणि महाराज हे पुनरागमन करतील.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, एन्रिक नॉर्टजे, क्वेना माफाका, जॉर्ज लिंडे, जेसन स्मिथ.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.