For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची टी-20 खेळण्याची शैली बदलणार नाही

06:14 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताची टी 20 खेळण्याची शैली बदलणार नाही
Advertisement

पराभव झाला तरी आक्रमक धोरण कायम ठेवणार : गौतम गंभीर

Advertisement

वृत्तसंस्था

हॅमिल्टन : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या टी-20 खेळण्याच्या शैलीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. संघाची विचारसरणी आणि खेळाचे तत्त्वज्ञान बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कधी मोठा विजय मिळेल, तर कधी मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागेल; मात्र आक्रमक क्रिकेट खेळण्याची भूमिका कायम राहील, असे गंभीर यांनी सांगितले.

Advertisement

न्यूझीलंडविऊद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका भारताने 3-2 अशी जिंकली. मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली होती. मात्र, शेवटच्या दोन सामन्यांत न्यूझीलंडने विजय मिळवला. पाचव्या सामन्यात भारताला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर यांनी संघाच्या आक्रमक खेळाच्या धोरणाचे समर्थन केले.

‘हाय रिस्क, हाय रिवॉर्ड’ हेच धोरण

गंभीर म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय संघ टी-20 क्रिकेटमध्ये ‘हाय रिस्क, हाय रिवॉर्ड’ या तत्त्वावर खेळत आहे. या शैलीत खेळताना काही वेळा मोठे विजय मिळतील, तर काही वेळा मोठ्या फरकाने पराभवही होऊ शकतो. मात्र, केवळ पराभवाच्या भीतीने खेळण्याची पद्धत बदलणार नाही. संघाच्या मागील दोन वर्षांतील यशामागे याच विचारसरणीचा मोठा वाटा आहे.

काही सामन्यांत संघ 100 धावांनी पराभूत होऊ शकतो, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या 10 षटकांत 150 धावांचे लक्ष्य गाठू शकतो. आम्हाला अशाच प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा भारतात कुठेही खेळत असलो, तरी आमची खेळण्याची शैली समान राहील, असे गंभीर यांनी स्पष्ट केले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचे कौतुक

न्यूझीलंडविऊद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचे गंभीर यांनी विशेष कौतुक केले. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अनुभव नसलेल्या गोलंदाजीच्या आक्रमणासह मालिका जिंकणे हे आव्हानात्मक होते. तरीही श्रेयसने संघाचे उत्तम नेतृत्व केले, असे गंभीर म्हणाले.

जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे प्रमुख खेळाडू उपलब्ध नसतानाही भारतीय संघाने मालिकेत चांगली कामगिरी केली. युवा खेळाडूंना संधी देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळवून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युवा खेळाडूंना संधी देण्यावर भर

पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने युवा खेळाडूंना संधी देणे आणि त्यांना वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खेळण्याचा अनुभव देणे महत्त्वाचे आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या परदेशी दौऱ्यांमध्ये अनेक युवा खेळाडू प्रथमच खेळत होते. कमी तयारीचा वेळ आणि वेगळ्या हवामान परिस्थिती असूनही खेळाडूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे गंभीर यांनी सांगितले.

पराभवाची भीती नाही; धोरण कायम

भारतीय संघाच्या आक्रमक खेळण्याच्या पद्धतीवर टीका होत असली, तरी त्यात बदल करण्याचा विचार नसल्याचे गंभीर यांनी स्पष्ट केले. निकालापेक्षा खेळाडूंनी मैदानावर आपली क्षमता आणि आक्रमकता दाखवणे महत्त्वाचे आहे. पराभव स्वीकारण्याची तयारी ठेवूनच मोठे विजय मिळवता येतात. त्यामुळे भारतीय संघाचे टी-20 क्रिकेटमधील तत्त्वज्ञान आणि खेळण्याची शैली कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.