आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी
वृत्तसंस्था, ताश्कंद (उझबेकिस्तान)
येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई बॉक्सिंग यू-15 आणि यू-17 अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या युवा मुष्टियोद्ध्यांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करत दोन्ही गटांमध्ये अनेक विजय नोंदविले.
यू-15 मुलांच्या गटातील स्पर्धेत नोंगपोकंगनबा मेईतेई ओईना (46 किलो) याने कझाकस्तानच्या अब्दुरखमान वुशानलोवर 5-0 असा निर्णायक विजय मिळवला. 49 किलो गटात प्रशांतने याच निकालाची पुनरावृत्ती करत बकदाउलेट अखमेत याच्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. 58 किलो गटात मोहम्मद यासेरने आपल्या वर्चस्वपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने किर्गिस्तानच्या अकबरझान नबिदझानोव्हविरुद्धच्या लढतीत पहिल्याच फेरीत आरएससी (पंचांनी सामना थांबवणे) द्वारे विजय निश्चित केला. 54 किलो गटात निवेश पालने कझाकस्तानच्या आदिलत गालियेव्हवर 5-0 असा विजय मिळवून आपली छाप पाडली. तर 66 किलो गटात रणवीर याला चिनी तैपेईच्या यिंग चिएह चेन विरुद्ध पुढे चाल मिळाल्याने तो पुढील फेरीत दाखल झाला.
इतर लढतींमध्ये 61 किलो गटामध्ये लिलमणी सिंग लुक्रम याला उझबेकिस्तानच्या अझिझबेक एगांबरगानोव्हविरुद्ध तिसऱ्या फेरीत आरएससीद्वारे पराभव पत्करावा लागला तर 70 किलो गटात मेहुल राणाला कझाकस्तानच्या अयान बॉयरझानाविरुद्धच्या पहिल्या फेरीत आरएससीद्वारे पराभवाचा सामना करावा लागला.
यू-17 मुलांच्या गटातील सायंकाळच्या सत्रात 54 किलो गटातील पाल निवेशने आपला दमदार फॉर्म कायम राखत कझाकस्तानच्या आदिलत गालियेव्हवर पुन्हा एकदा 5-0 असा विजय मिळविला. 66 किलो गटात रणवीरने चीन तैपेईच्या यिंगचिएह चेनविरुद्ध एबीडी (प्रतिस्पर्ध्याने सामना सोडून देणे) द्वारे विजय नोंदवला. 75 किलो गटात लक्ष्य फोगटने अत्यंत प्रभावी कामगिरी करत श्रीलंकेच्या रान्चीगोडागामा अराचचिलाविरुद्ध पहिल्याच फेरीत आरएससीद्वारे विजय मिळवला. मात्र 63 किलो गटात प्रदीप आणि 80 किलो गटात हंजरा जयदीप सिंग यांना तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागला. त्यांना अनुक्रमे उझबेकिस्तानच्या रुशेन सैदुल्लायेव्ह आणि कझाकस्तानच्या अलिबेक अल्पामिस यांच्याकडून 5-0 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. ताश्कंदमध्ये सुरू असलेल्या या अजिंक्यपद स्पर्धेत, काही सामन्यांमधील एकतर्फी वर्चस्वपूर्ण विजय आणि काही सामन्यांमधील अटीतटीच्या लढतींच्या जोरावर भारतीय संघ विविध वयोगटांमध्ये आपली भक्कम खोली आणि आशादायक गुणवत्ता सातत्याने सिद्ध करत आहे.