For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागरिक जीवितहानीला भारताचा तीव्र विरोध

06:46 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
नागरिक जीवितहानीला भारताचा तीव्र विरोध
Advertisement

इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे स्पष्ट प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

निरपराध नागरिकांच्या जीवितहानीला भारताचा तीव्र विरोध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध होत आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. 7 ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला केला होता. त्यामुळे हे युद्ध होत आहे.

Advertisement

‘ग्लोबल साऊथ’च्या भारत आयोजित दुसऱ्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन ऑनलाईन केले जाते. पश्चिम आशियामध्ये ज्या समस्या आहेत, त्यांच्यावरील तोडगा संवाद आणि सामोपचार यांच्या माध्यमातून काढला जावा. तसेच सर्व संबंधित पक्षांनी या संदर्भात संयमित कृती करावी, असे भारताचे मत प्रारंभापासून आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

दहशतवादाचा निषेध

7 ऑक्टोबरला इस्रायलवर भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. भारताने या हल्ल्याचा अतिशय तीव्र आणि कठोर शब्दांमध्ये निषेध त्याचवेळी केला होता. त्याचप्रमाणे युद्धकाळात निर्दोष नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित झाली पाहिजे. त्यांना युद्धाची झळ कमीत कमी पोहचावी अशी व्यवस्था झाली पाहिजे, असेही भारताचे आग्रही प्रतिपादन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताकडून मानवीय सहाय्य

गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांची पॅलेस्टाईन प्रशासनाचे नेते मोहम्मद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाली होती. अब्बास यांनी परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणावर मानवीय साहाय्यता सामग्री गाझा पट्टीत पोहचविण्याची व्यवस्था केली होती. दक्षिण गोलार्धातील देशांनी आता एका ध्येयासाठी एका आवाजात बोलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हा आवाज जगाच्या कल्याणासाठी असावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जी-20 ची प्रगती स्पृहणीय

यंदाच्या वर्षी भारताने जी-20 या जागतिक परिषदेचे नेतृत्व पेले होते. या नेतृत्वकाळात या परिषदेची सर्वसमावेशकता वाढली आहे. आफ्रिकेतील देशांना या परिषदेत स्थान मिळवून देण्यात भारत यशस्वी ठरला होता, याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच जगात नवे नवे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानामुळे जगाची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्यथा हे तंत्रज्ञान मानवतेच्या उपयोगी पडण्यापेक्षा नवे संघर्ष निर्माण होण्याचे कारण ठरले तर हानी अधिक होईल. हे टाळणे आवश्यक आहे, असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी दिला.

Advertisement
Tags :

.