समुद्रात वाढणार भारताचे सामर्थ्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय नौदलाला पुढील तीन महिन्यांमध्ये 4 नव्या युद्धनौका आणि एक नवी पाणबुडी मिळणार आहे. याचबरोबर नौदलाला एक सर्वे वेसल तसेच डायव्हिंग सपोर्ट वेसलही प्राप्त होणार आहे. यातील एक युद्धनौका रशियामध्ये निर्माण केली जात आहे. तर उर्वरित युद्धनौका आणि पाणबुडीची निर्मिती भारतातच झाली असून त्यांचे परीक्षण विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. रशियात निर्माण होत असलेली तलवार श्रेणीच्या तिसऱ्या बॅचचे पहिली गायडेड मिसाइल फ्रिगेट नोव्हेंबरपर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. ही युद्धनौका 3600 टनापेक्षा अधिक वजनाची असून यात 180 नौसैनिक 9 हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात. ही फ्रिगेट ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असणार आहे.
गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत विशाखापट्टणम श्रेणीची चौथी अणि अखेरची गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. ही डिस्ट्रॉयर 7400 टन वजनाची असून यातही ब्राह्मोस क्षेपणास्त्र जोडण्यात आले आहे. तसेच यात 32 बरॅक क्षेपणास्त्रs आहेत, जी 100 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतात. याचबरोबर शत्रूच्या पाणबुडीला नष्ट करण्यासाठी रॉकेट अन् टॉरपिडो या युद्धनौकेवर असतील.
फ्रिगेट नीलगिरी लवकरच नौदलात
भारतीय नौदलाला चालू वर्षात नीलगिरी श्रेणीची पहिली गायडेड मिसाइल फ्रिगेट नीलगिरी प्राप्त होणार असून याचे वजन 6670 टन असून यात 8 ब्राह्मोस क्षेपणास्त्रs जोडण्यात आली आहेत. यात बरॅक क्षेपणास्त्र, रॉकेट आणि टॉरपिडो देखील तैनात करण्यात आले आहे. शत्रूच्या पाणबुडीला लक्ष्य करण्यासाठी माहे क्लासची पाणबुडीविरोधी युद्धनौका नोव्हेंबरमध्ये नौदलात सामील होईल. समुद्र किनाऱ्यानजीक कमी खोल पाण्यात असलेल्या पाणबुडीचा शोध लावणे व नष्ट करण्यास ही सक्षम आहे. यात टॉरपीडोसमवेत आधुनिक सोनार सिस्टीम बसविली आहे.
कल्वरी श्रेणीची पाणबुडी
कल्वरी श्रेणीची 6 वी आणि अंतिम पाणबुडी नोव्हेंबर महिन्यात नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. ही पाणबुडी 50 दिवसांपर्यंत पाण्यात राहू शकते. तसेच ही पाणबुडी एकाचवेळी 12,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. याचबरोबर समुद्रात संशोधन करणाऱ्या संध्यायक श्रेणीची मोठी सर्वेक्षण नौका चालू वर्षाच्या अखेरपर्यंत नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. समुद्रात संकटग्रस्त पाणबुडीच्या सहाय्यासाठी डायविंग सपोर्ट वेसल आणि डायविंग सपोर्ट क्राफ्ट देखील चालू वर्षातच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे.