मुक्त व्यापार करारांतर्गत देशांच्या निर्यातीत भारताची चमकदार कामगिरी
वाणिज्य मंत्रालयाची माहिती :एप्रिल-जून तिमाहीत 129 अब्ज डॉलर्सची निर्यात, सिंगापूर, श्रीलंकेला अधिक निर्यात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीत अर्थात एप्रिल ते जून या अवधीत विदेशी व्यापारात भारताने चांगले प्रदर्शन केलेले दिसून आले. वाणिज्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्या देशांशी मुक्त व्यापार करार झाला आहे त्या देशांना भारताने निर्यातीत नोंदणीय वाढ केली आहे. सदरच्या तिमाहीत पाहता निर्यात ही सिंगापूर व श्रीलंका या देशांना सर्वोत्तम झाली आहे.
श्रीलंका, सिंगापूरची निर्यात
भारताने अलीकडेच एफटीए अर्थात मुक्त व्यापार करार केला आहे त्या देशांकडून भारतीय उत्पादनांना मागणी वाढली असल्याचे पाहायला मिळाले आहे. वर म्हटल्याप्रमाणे भारताकडून श्रीलंका व सिंगापूर या देशांना अधिक निर्यात केली गेली आहे. एप्रिल ते जून या अवधीत सिंगापूर येथे 6.52 अब्ज डॉलर्सची निर्यात करत निर्यातीत 101 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. मागच्या वर्षी या अवधीत भारताने 3.24 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताने 2.35 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. जी मागच्या वर्षी याच अवधीत 1.05 अब्ज डॉलर्सची होती. म्हणजेच श्रीलंकेची निर्यात तिमाहीत 123 टक्के वाढली आहे.
आशियाई देशांनाही निर्यात लक्षणीय
तिकडे दक्षिण पूर्व आशियाई देशांची संघटना आशियान क्षेत्रातही भारताने निर्यातीत 61 टक्के वाढ नोंदवली आहे. 14.61 अब्ज डॉलर्सची उत्पादन निर्यात भारताने तिमाहीत केली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत 9.04 अब्ज डॉलर्सची भारताने निर्यात केली होती.
वेगवेगळ्या देशांचा विचार करता भारताने मलेशियाला 2.54 अब्ज डॉलर्सची तर ऑस्ट्रेलियाला 2.68 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. मलेशियाला निर्यातीत 75 टक्के वाढ झाली असून ऑस्ट्रेलियात ही वाढ 25 टक्के इतकी झाली आहे. याचसोबत ब्रिटनच्या निर्यातीत 11 टक्के वाढ झाली असून एप्रिल ते जून तिमाहीत 3.69 अब्ज डॉलर्सची भारताने निर्यात केली आहे. दोन्ही देशांशी व्यापार करार 15 जुलै 2026 पासून लागू झाला आहे. याचदरम्यान दक्षिण कोरीयाची निर्यात 1.95 अब्ज डॉलर्सची झाली आहे.
जपान, ओमान, भूतानची निर्यात
जपानची निर्यात 22 टक्के वाढत 1.75 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. ओमानच्या निर्यातीत 26 टक्के वाढ झाली असून 1.39 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने त्या देशाला केली आहे. शेजारच्या भूतानलाही भारताने निर्यात सुरु ठेवली असून 16 टक्के वाढीसह 36 कोटी डॉलर्सची निर्यात करण्यात भारताला यश आलंय. थायलंडची निर्यात 6 टक्के वाढीसोबत 1.23 अब्ज डॉलर्सची झाली आहे.
एकंदर 120 अब्ज डॉलर्सची निर्यात
मुक्त व्यापार करार केलेल्या देशांना एप्रिल ते जून अवधीत भारताने एकंदर 120.32 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. तिमाहीत निर्यात 15.92 टक्के वाढली आहे. भारताने जवळपास 17 देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यात 16 देशांमध्ये मुक्त व्यापार करार लागू झाला आहे.