भारताच्या ‘शुक्रयान’ची 2028 मध्ये झेप
चार वर्षांची मोहीम ; जीएसएलव्ही मार्क-2 रॉकेटद्वारे प्रक्षेपण अपेक्षित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची पहिली शुक्र मोहीम मार्च 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर रोजी या मोहीमेला मान्यता दिली. ही मोहीम चार वर्षे चालणार आहे. शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी किमी अंतरावर आहे. शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. तथापि, येथे दिवस आणि रात्र यात बराच फरक आहे. शुक्र आपल्या अक्षावर अतिशय संथ गतीने फिरत असल्यामुळे शुक्राचा एक दिवस पृथ्वीच्या 243 दिवसांच्या बरोबरीचा आहे.
भारत मार्च 2028 मध्ये शुक्र मोहीम प्रक्षेपित करणार आहे. याप्रसंगी शुक्र हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आणि पृथ्वीपासून सर्वात जवळ असणार आहे. ही वेळ न साधल्यास पुढील संधी 2031 मध्ये येणार आहे. भारताने सोडलेला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर त्याला शुक्रावर पोहोचण्यासाठी सुमारे 140 दिवस लागतील. शुक्र मोहिमेचा कालावधी चार वर्षे असणार आहे. शुक्रयान जीएसएलव्ही मार्क-2 रॉकेटने प्रक्षेपित केले जाईल अशी अपेक्षा आहे. शुक्रयानाचे वजन सुमारे 2,500 किलो असेल. यात 100 किलो वजनाचे पेलोड असतील. भारताची ही मोहीम शुक्राच्या कक्षेचा अभ्यास करणार आहे. ग्रहाचा पृष्ठभाग, वातावरण, आयनोस्फीअर (वातावरणाचा बाह्या भाग) आदींची माहिती या मोहिमेतून प्राप्त होणार आहे.