भारताच्या दणक्यामुळे झाली शस्त्रसंधी
परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे स्पष्ट वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने ‘सिंदूर’ अभियानांतर्गत पाकिस्तानला जो दणका दिला, त्यामुळेच त्या देशाला शस्त्रसंधीसाठी विनवणी करणे भाग पडले असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री. ए. जयशंकर यांनी केले आहे. हे विधान त्यांनी अमेरिकेच्या ‘पॉलिटिको’ नामक एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. आमचा संघर्ष दहशतवादाशी असून दहशतवादी पाकिस्तानात कोठेही असले, तरी त्यांना शोधून काढून संपविण्याचा भारताचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तान हा देश दहशतवादाचा पोषणकर्ता आहे. भारताने अनेकदा त्या देशाला सुधारण्याची संधी दिली. तथापि, त्या देशाचे दहशतवादप्रेम संपत नाही. भारताच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाचा थेट परिणाम भारतावर होत असल्याने भारताला त्याच्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आम्ही दहशतवादाविरोधात शून्य सहनशक्ती हे धोरण अवलंबिले आहे. पाकिस्तानात कोठेही हल्ला करुन दहशतवाद्यांना नष्ट करण्याची भारताची क्षमता आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी या मुलाखतीत केले.
पाकिस्तानचे राजकीय धोरण
दहशतवाद हे पाकिस्तानचे राजकीय हत्यार आणि धोरण आहे. हाच मुख्य मुद्दा आहे. पाकिस्तानने दहशतवादाला पोसणे असेच कायम ठेवले, तर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सशस्त्र संघर्ष होऊ शकतो. भारत आता केवळ शांततेचा आणि सौहार्दाचा मार्ग चोखाळत स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तान दहशतवादाचा उपयोग भारताची हानी करण्यासाठी करत आहे. पाकिस्तानला शस्त्रबळावर रोखणे हे भारताचे कर्तव्यच आहे, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली.
भारताची विमाने पडली का ?
या मुलाखतीत त्यांना शस्त्रसंधी आणि भारताची विमाने पडण्यासंबंधीही प्रश्न विचारण्यात आला. ‘राफेल किंवा भारताची इतर युद्धविमाने तसेच इतर सामरिक यंत्रणा किती प्रभावी आहेत, हे पाकिस्तानची जी हानी झाली, त्या देशाचे जे वायुतळ उध्वस्त झाले, किंवा जी मोठी हानी त्या देशाच्या वाट्याला आली, यावरुन सिद्ध होत आहे. पाकिस्तानची जी जबर हानी झाली, त्यामुळेच त्या देशाला शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाठवावा लागला. अशा स्थितीत हीच बाब सर्वात महत्वाची आहे, असे एस. जयशंकर यांनी त्यांच्या उत्तरात स्पष्ट केले आहे.
हानीचे स्पष्ट पुरावे उपलब्ध
पाकिस्तानची हानी किती झाली, हे समजून घेण्यासाठी केवळ आमच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे असे नाही. त्याचे प्रत्यक्ष उपग्रहीय पुरावे आहेत. ते साऱ्या जगासमोर आहेत. प्रत्यक्ष पाकिस्तानलाही ते मान्य करावे लागले आहेत. सोशल मिडियावर आज हे पुरावे साऱ्यांच्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे यासंबंधी कोणतीही शंका कोणाच्याही मनात नाही, असेही त्यांनी ठणकावले.
भारताने सांगितल्यापेक्षाही अधिक
भारताच्या सेनाधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या झालेल्या हानीची जी माहिती दिली, त्यापेक्षाही ती अधिक आहे, हे प्रत्यक्ष पाकिस्ताननेच मान्य केले आहे. भारताने पाकिस्तानचे 11 तळ उध्वस्त केल्याचे प्रतिपादन केले होते. पाकिस्नातच्या स्वत:च्या कागदपत्रांच्या अनुसार त्याचे 20 तळ नष्ट किंवा हानीग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अ•dयांसह एकंदर 46 ते 48 स्थाने भारताच्या माऱ्याच्या कचाट्यात सापडली आहेत, असे पाकिस्तानच्याच अहवालात स्पष्ट करण्यात आले असून या गुप्त अहवालाचा महत्वाचा भाग उघड झाला आहे. त्यानुसार पाकिस्तानची किमान सहा युद्धविमाने, दोन अॅवॅक्स विमाने, 1 लष्करी मालवाहू विमान, किमान 10 चालकरहित वायुवाहने, दोन रडार यंत्रणा, किमान 50 सैनिक नष्ट झाले आहेत. इतरही मोठी हानी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
शस्त्रसंधीसंबंधी महत्वाची विधाने
ड भारताने जबर हानी केल्याने पाकिस्तानला वाकण्याशिवाय नव्हता पर्याय
ड पाकिस्तानच्या जबर हानीचे पुरावे सर्वांसमोर, त्यांच्यासंदर्भात नाही शंका
ड यापुढेही पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्या पुन्हा देणार मोठा तडाखा
ड दहशतवाद हाच खरा आंतरराष्ट्रीय मुद्दा, काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा