भारताचा द.आफ्रिकेवर मालिकाविजय
तिसऱ्या वनडेत यजमानांवर 78 धावांनी मात, सामनावीर सॅमसनचे शतक, मालिकावीर अर्शदीपचे 4 बळी, झॉर्झीची एकाकी लढत वाया
वृत्तसंस्था /पार्ल
सामनावीर संजू सॅमसनचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, तिलक वर्माचे अर्धशतक आणि मालिकावीर अर्शदीपच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारताने तिसऱ्या व शेवटच्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 2018 नंतर भारताने विदेशात जिंकलेली ही दुसरी मालिका आहे. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने संजू सॅमसनने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर 50 षटकांत 8 गडी गमावून 296 धावा केल्या. संजू सॅमसनचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले आहे. याशिवाय, तिलक वर्माने अर्धशतक तर रिंकू सिंगने देखील फटकेबाजी केली. त्यानंतर भारताने द.आफ्रिकेचा डाव 45.5 षटकांत 218 धावांत गुंडाळून सामन्यासह मालिकाविजय मिळविला.
द.आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. 2 बाद 141 अशी त्यांची स्थिती असताना ते हा सामना जिंकतील असे वाटले होते. पण कर्णधार मार्करम तिसऱ्या गड्याच्या रूपात बाद झाल्यानंतर त्यांचा डाव 218 धावांत गडगडला आणि उर्वरित फलंदाजांनी केवळ 77 धावांची भर घातली. दुसऱ्या सामन्यातील शतकवीर टोनी डी झॉर्झीने या सामन्यातही शतकाच्या दिशेने आगेकूच केली होती. तो असेपर्यंत आफ्रिकेला विजयाची आशा वाटत होती. पण तो 81 धावा काढून बाद झाला आणि त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. कर्णधार मार्करमने 41 चेंडूत 36, क्लासेनने 21, ब्युरन हेन्ड्रिक्सने 18, रीझा हेन्ड्रिक्सने 19 धावा केल्या. एकाकी लढत देणाऱ्या झॉर्झीने 87 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार मारले. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने किफायतशीर मारा करीत 38 धावांत 2 बळी टिपले तर आवेश खानने 2, मुकेश कुमार व अक्षर पटेल यांनी एकेक बळी मिळविला. अर्शदीप सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 30 धावांत 4 बळी मिळविले. आता या दोन संघांत कसोटी मालिका होणार असून 26 डिसेंबरपासून त्याची सुरुवात होईल.
सॅमसनचे शतक, वर्माचे अर्धशतक
प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रजत पाटीदार 22 धावांवर तंबूत परतला. मागील दोन सामन्यात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या साई सुदर्शनने या सामन्यात निराशा केली. अवघ्या 10 धावा काढून तो बाद झाला. यावेळी टीम इंडियाची 2 बाद 49 अशी स्थिती होती. यावेळी संजू सॅमसनने कर्णधार केएल राहुलसोबत 52 तर तिलक वर्मासोबत 116 धावांची भागीदारी साकारली. राहुलला फार मोठी खेळी करता आली नाही, त्याने 21 धावा केल्या. संजूने मात्र आपले पहिले वहिले वनडे शतक झळकावताना 114 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 108 धावा फटकावल्या. त्याला तिलक वर्माने 85 चेंडूत 52 धावा करत चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये रिंकूने 27 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 38 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर 14, तर अक्षर पटेल 1 धाव करून बाद झाले. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 296 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी ब्युरन हेंड्रिक्सने 63 धावांत तीन विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गरने दोन तर लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
निर्णायक सामन्यात संजूची जबाबदार इनिंग, वनडेतील पहिले शतक
विकेटकीपर संजू सॅमसन नेहमीच टीम इंडियामध्ये आतबाहेर होत असतो. काही वेळा त्याला संधी मिळाली पण त्याचे सोने त्याला करता आले नाही. यासोबतच बेजबाबदार फटके खेळून आऊट होतो, असाही आरोप त्याच्यावर नेहमीच होत असतो. गुरुवारी मात्र आफ्रिकेविरुद्ध निर्णायक सामन्यात संजूने शतकी खेळी साकारत टीकाकारांची मने जिंकली आहेत. सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात 2021 मध्ये केली असून मागच्या 15 सामन्यांमध्ये त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने 402 धावा केल्या होत्या. कारकिर्दीतील 16 व्या वनडेत मात्र त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. त्याच्यासाठी हे केवळ वनडे क्रिकेटमधीलच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. त्याने 114 चेंडूत 108 धावा केल्यानंतर तो बाद झाला. याआधी त्याची सर्वोत्तम खेळी 86 धावांची होती, जी त्याने लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. दरम्यान, या मालिकेपूर्वी संजू आपला शेवटचा सामना विंडीजविरुद्ध खेळला होता.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 8 बाद 296 (रजत पाटीदार 22, संजू सॅमसन 108, तिलक वर्मा 52, केएल राहुल 21, रिंकू सिंग 38, सुंदर 14, हेंड्रिक्स 63 धावांत 3, बर्गर 64 धावांत 2, मुल्डर 1 बळी). द.आफ्रिका 45.5 षटकांत सर्व बाद 218 : टोनी डी झॉर्झी 87 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 81, मार्करम 41 चेंडूत 36, क्लासेन 22 चेंडूत 21, रीझा हेन्ड्रिक्स 24 चेंडूत 19, ब्युरन हेन्ड्रिक्स 26 चेंडूत 18, केशव महाराज 14, अवांतर 13. गोलंदाजी : अर्शदीप 4-30, आवेश खान 2-45, वॉशिंग्टन सुंदर 2-38, मुकेश कुमार 1-56, अक्षर पटेल 1-48.